भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा(AKFI) सावळा गोंधळ

-शारंग ढोमसे (Twitter- @ranga_ssd)
आशियाई स्पर्धा जवळ आल्या असतांनाच भारतीय कबड्डी वर्तुळात एक नवीन वाद उफाळून आला आहे. भारतीय कबड्डी महासंघ (AKFI) चे आजीवन अध्यक्ष जनार्दन गेहलोत व त्यांच्या परिवारावर अनेक गैरप्रकारांचे आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यानंतर लागलीच आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आले आहे मात्र त्यात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकारणाविषयी:

वाद प्रकाशझोतात येण्याचे कारण?

आशियाई स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात अनेक आश्चर्यकारक निवडी झाल्या आहेत.राष्ट्रीय स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी न केलेल्या खेळाडूंचीही संघात वर्णी लागली आहे.राजस्थान च्या महिला संघाने राष्ट्रीय स्पर्धेत कोणतीही वाखाणण्याजोगी कामगिरी केलेली नसतांनाही या संघातील २ खेळाडूंचा समावेश भारतीय संघात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेत आणि फेडरेशन चषक स्पर्धेत ३ ऱ्या स्थानी असणाऱ्या हरयाणा आणि राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या महाराष्ट्र संघातील प्रत्येकी एकाच खेळाडूला संघात स्थान मिळाले आहे. इराण येथे पार पडलेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या कर्णधार असलेल्या अभिलाषा म्हात्रे आणि उप कर्णधार प्रियांका या दोघींनाही वगळण्यात आले आहे.

पुरुष संघातही अत्यंत अनपेक्षित बदल करण्यात आलेले आहे. प्रो कबड्डीतला सर्वोत्तम बचावपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो सुरेंदर नाडा, सेनादलाला फेडरेशन चषक जिंकवण्यात महत्वाचा वाटा उचलणारा व नुकत्याच पार पडलेल्या ‘कबड्डी मास्टर्स, स्पर्धेतही चमकदार कामगिरी करणारा सुरजित सिंग यांना संघाबाहेर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे कबड्डी रसिकांकडून रोष प्रकट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही याचिका(पूर्वी दाखल झालेली) प्रकाशझोतात आली आहे.

कोणी दाखल केली आहे याचिका?
सी.होनाप्पा, एस.राजारत्नम व इतर काही अर्जुन पुरस्कार विजेत्या माजी कबड्डीपटूंनी ही याचिका दाखल केली आहे.

कोणाविरुद्ध आहे ही याचिका?
AKFI चे आजीवन अध्यक्ष जनार्दन गेहलोत व त्यांच्या परिवारविरोधात तसेच AKFI विरुद्ध ही याचिका आहे.

काय आहेत याचिकेतील प्रमुख आरोप आणि मागण्या?
१.जनार्दन गेहलोत यांचे वय ७३ वर्षे असून ते २१ वर्षे AKFI चे अध्यक्ष होते.या नंतर त्यांनी AKFI च्या घटनेत बदल करून स्वतःकडे आजीवन अध्यक्ष पद घेतले. नियमांनुसार ७० पेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती अधिकृत क्रीडा संघटनेची अध्यक्ष म्हणून कायम राहू शकत नाही त्याचप्रमाणे १२ वर्षांपेक्षा अधिक काळ कोणालाही एकाच संघटनेचे अध्यक्षपद भूषवता येत नाही. त्यामुळे जनार्दन गेहलोत यांना अध्यक्षपदावरून ताबडतोब हटवण्यात यावे.
२.AKFI च्या विद्यमान अध्यक्षा मृदुला भडोरिया गेहलोत या कधीही कोणत्याही राज्य क्रीडा संघटनेच्या सदस्य राहिल्यात नाहीत किंवा त्या कबड्डी खेळाडूही नाहीत त्यामुळे नियमानुसार त्याही अध्यक्षपदावर राहू शकत नाही.
३.AKFI च्या पदाधिकाऱ्यांकडून खोटी किंवा बनावट प्रमाणपत्रे दिली जातात.उदाहरणार्थ,राज्य संघात नाव नसतांनाही व्यक्तींना राष्ट्रीय स्पर्धेतील समावेशाचे प्रमानपत्र दिले जाते ज्याचा वापर शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केला जातो.
४.निवड प्रक्रियेत पारदर्शकता नाही,निवड करताना नियमांना बगल दिली जाते,खेळाडूंकडून निवडीसाठी पैसे मागितले जातात.
५.या सर्व गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी व जोपर्यंत हे चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत AKFI चे कामकाज चालवण्यासाठी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश असलेली तदार्थ समिती निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात यावी

काय आहे याचिकेची सध्यस्थीती?
सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली असून जनार्दन गेहलोत व परिवार,AKFI,भारतीय ऑलिम्पिक संघ केंद्र सरकार यांना नोटीस बजावली आहे.उत्तरासाठी २ आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या संबंधीची पुढील सुनावणी २ आठवड्यांनी होणे अपेक्षित आहे.

काही अनुत्तरित प्रश्न?
१.आशियाई स्पर्धेसाठी पार पडलेल्या संघ निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पुन्हा नव्याने संघनिवड होणार का?
२.पात्रता,क्षमता आणि कामगिरी असूनही संघात निवड न झालेल्या खेळाडूंना न्याय मिळणार का?
३.भारतीय कबड्डीवर असलेली गेहलोत कुटुंबाची मक्तेदारी संपुष्टात येणार का?
४.निवड प्रक्रियेतील राजकारण,अनिश्चितता आणि प्रादेशिकवाद दूर होणार का?
५.ज्याप्रमाणे इतर खेळांत खेळाडू अन्यायाविरुद्ध आवाज उठवतांना दिसतात त्याचप्रमाणे कबड्डीपटूही ठाम भूमिका घेतील का?
६.गेल्याच वर्षी कबड्डी खेळाडूंचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेली भारतीय कबड्डी महासंघाची ‘अथलिट कमिशन(खेळाडू आयोग)’ या विषयी काय भूमिका घेणार?
कबड्डी वर्तुळात चाललेला हा सावळा गोंधळ नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या कबड्डीची प्रतिमा डागाळणारा आहे त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयानेच आता योग्य भूमिका घेऊन हा गोंधळ दूर करणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आहे जगातील सर्वात स्फोटक खेळाडू परंतू फलंदाजीत केला नकोसा विक्रम

सलग ७ वनडे मालिकांत ७ शतके करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव खेळाडू

या वर्षी पहिल्या ६ महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारे ४ खेळाडू

आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम

भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..