अखिल भारतीय मेजर पोर्ट हॉलीबॉल स्पर्धा: कोचीन पोर्ट ट्रस्टचे सलग २७वे जेतेपद, शुभम सिंग ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू.

कोचीन पोर्ट ट्रस्टने यजमान मुंबई पोर्ट ट्रस्टचा २५-२२; २५-१५ ; २५-२३ असा ३सरळ सेट मध्ये पराभव करीत सलग २७व्या अखिल भारतीय मेजर पोर्ट हॉलीबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. मुंबई पोर्ट ट्रस्टचा शुभम सिंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला. अखिल भारतीय मेजर पोर्ट बोर्डच्या मान्यतेने मुंबई पोर्ट ट्रस्ट कौन्सिल बोर्डच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टला अंतिम फेरी गाठण्यात यश आले.पण संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या व गेली सलग २६वर्ष या स्पर्धेत विजेते राहिलेल्या कोचीन पोर्ट ट्रस्टला घरच्या मैदानावर नमवून त्यांची मक्तेदारी तोडण्यात मात्र त्यांना अपयश आले.

मुंबईतील नाडकर्णी पार्क मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात कोचीन पोर्ट ट्रस्टने मुंबई पोर्ट ट्रस्टला नमवित हॉलीबॉल स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखला. कोचिनच्या स्पायकर आणि ब्लॉकर यांनी मुंबईला सावरण्याची संधीच दिली नाही. अन्सारी, अब्दुल समीर, एबीन मार्टिन कोचीनच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

मुंबईकडून शुभम सिंग यांनी एकाकी झुंज दिली. कोचीन पोर्ट ट्रस्टचे अब्दुल समीर आणि एबीन मार्टिन अनुक्रमे बेस्ट लिफ्टर आणि स्मॅशर ठरले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई मेजर पोर्ट कौन्सिल बोर्डचे चेअरमन पी पी पैभीर, एम आर एस कुरेशी, सचिव के एस वत्स, मुंबई पोर्ट ट्रस्टचे फायनान्स अकाउंट ऑफिसर नाथ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.