ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेत सोलापूर, हेमंत पाटील स्पोर्ट्स अकादमीची विजयी सलामी

पुणे | सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना व हेमंत पाटील स्पोर्ट्स अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर आजपासून सुरु झालेल्या पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे उदघाटन एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलजार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

समृद्धी म्हात्रे व ऐश्वर्या गिरे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाने राजस्थान संघाला पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली. राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. राजस्थानच्या मनीषा सिंगने दमदार ८० धावांची नाबाद खेळी केली. तिला सोनिका सिंगने १८ धावा करताना सुरेख साथ दिली.

सोलापूर संघाकडून अंजली चित्तेने १६ धावांत ३ गाडी बाद केले. साक्षी बनसोडे व सीमा मलगुंडे यांनी प्रत्येकी एक गाडी बाद केला. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाने १८ षटकांत १ बाद १३९ धावा करताना विजयी साकारला. सोलापूर संघाकडून समृद्धी म्हात्रे व ऐश्वर्या म्हात्रे यांनी प्रत्येकी ५३ धावांची खेळी केली. सोनिका सिंगने एक गडी बाद केला. सोलापूर संघाच्या ऐश्वर्या गिरेला सामनावीर घोषित करण्यात आले.

दुसऱ्या लढतीत हेमंत पाटील स्पोर्ट्स अकादमी संघाने पंजाब संघाला पराभूत केले. हेमंत पाटील स्पोर्ट्स अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकांत ३ बाद १२८ धावा केल्या. यात पूनम खेमनारने ७ चौकारांच्या मदतीने दमदार ५९ धावांची खेळी केली. तिला सायली लोणकरने ३५ (५ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. पंजाब संघाकडून संगीता सिंधूने २ तर अंबिका पांजलाने १ गडी बाद केला. पंजाब संघाला हे आव्हान पेलवले नाही.

पंजाब संघाने निर्धारित १८ षटकांत ६ बाद १०७ धावांपर्यंत मजल मारली. पंजाब संघाकडून नीलम बिश्तने ३३ धावांची खेळी केली. तिला अंबिका पांजलाने १९ तर मोनिका पांडेने १२ धावा करताना साथ दिली. पूनम खेमनारने २ तर सायली लोणकर, वैष्णवी काळे, इनाक्षी चौधरी व संजना वाघमोडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पूनम खेमनारला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान : २० षटकांत ६ बाद १३८ (मनीषासिंग नाबाद ८० (४ चौकार), सोनिका सिंग १८ (१ चौकार), अंजली चित्ते ३-०-१६-३, सीमा मलगुंडे२-०-१७-१, साक्षी बनसोडे २-०-१८-१) पराभूत विरुद्ध सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना : १८ षटकांत १ बाद १३९ (ऐश्वर्या गिरे नाबाद ५३ (६ चौकार), समृद्धी म्हात्रे नाबाद ५३ (५ चौकार) सोनिका सिंग ४-०-२३-१) सामानावीर : ऐश्वर्या गिरे.

हेमंत पाटील स्पोर्ट्स अकादमी : १८ षटकांत ३ बाद १२८ (पूनम खेमनार ५९ (७ चौकार), सायली लोणकर ३५ (५ चौकार), संगीता सिंधू ४-०-१७-२, अंबिका पंजाला ४-०-३१-१) विजयी विरुद्ध पंजाब १८ षटकांत ६ बाद १०७ (नीलम बिश्त ३३ (६ चौकार), अंबिका पांजला १९ (३ चौकार), मोनिका पांडे १२ (१ चौकार) पूनम खेमनार ४-०-२८-२, सायली लोणकर ४-०-१६-१)