मोराटाची दुखापत चेल्सीच्या पराभवाचे मुख्य कारण

चेल्सी आणि मँचेस्टर सिटी या बहुचर्चित सामन्याचा निकाल मँचेस्टर सिटीच्या बाजूने लागला. मँचेस्टर सिटीने चेल्सीला १-० असे हरवले. या सामन्याच्या अगोदर सिटीचा संघ चेल्सी समोर कितपत टीकू शकेल यावर अनेक जाणकार आपली मते देत होती. मँचेस्टर सिटी जिंकेल असे भाकीत करणारे कमी असतील कदाचित.

या सामन्यापूर्वी सर्जिओ ऑग्वारो हा खूप मोठा चर्चेचा विषय होता. परंतु जेव्हा हा सामना सिटीने त्याच्या अनुउपस्थितीत जिंकला त्यामुळे त्याची चर्चा थोडी कमी झाली आहे. या सामन्यात चेल्सीच्या पराभवाचे एक मुख्य कारण सांगितले जाते ते म्हणजे आल्वोरो मोराटाला झालेली मांडीचे स्नायूची दुखापत. या दुखापतीमुळे तो दुसऱ्या सत्रातून मैदानाबाहेर गेला. त्यामुळे चेल्सी संघाला गोल करण्यात अपयश आले असे ही जाणकार मानतात.

आल्वोरो मोराटा याची दुसऱ्या सत्रातील अनुउपस्थिती हे मुख्य कारण मानले तर ते योग्य देखील वाटते. हा संघ मागील काही सामन्यांपासून मोराटावर गोल करण्यासाठी खूप अवलंबून राहिला आहे. त्याने मागील सहा सामन्यात पाच वेळा गोल केले होते. या सामन्यात त्याने गोल केला नाही परिणामी चेल्सी संघ गोलजाळे शोधण्यात अपयशी ठरला.

चेल्सीचे प्रशिक्षक अंतोनिओ कांटे यांनी सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांच्या विरुद्धचे मागील दोन्ही सामने जिंकले होते. या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. चेल्सी संघाला मोराटाला पर्यायी खेळाडू लवकरात लवकर शोधावा लागेल किंवा अन्य खेळाडूने गोल करण्याची जबाबदारी घ्यायला हवी अन्यथा या संघाचे सलग विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळेल. मोराटाची दुखापत किती गंभीर आहे याचा अजून तरी काही खुलासा करण्यात आला नाही.

या मोसमात अन्य काही मोठ्या संघाचे खेळाडू दुखापतीमुळे पुढील काही महिने मैदानाबाहेर असणार आहेत. त्यात बार्सेलोना आणि मँचेस्टर युनाइटेड संघाचा समावेश आहे. बार्सेलोना संघाचा नवीन खेळाडू डेबेले तर मँचेस्टर युनिटेडचा पॉल पोग्बा काही महिने मैदानाबाहेर असणार आहेत.

प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनाइटेड आणि टोटेनहम हॉट्सपुर हे अन्य संघ आहेत जे गोल करण्यासाठी सध्या एका एका खेळाडूवर जास्त अवलंबून आहेत. युनाइटेड साठी रोमेलू लुकाकू हा गोल करतो आहे तर स्पुर्ससाठी हॅरी केन गोल करण्याची जबाबदारी सांभाळतो आहे. या संघांना देखील अन्य खेळाडूवर काम करावे लागेल आणि गोल करण्याचे आपले पर्याय वाढवावे लागतील.