विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया

सोमवारी(15 एप्रिल) बीसीसीआय निवड समीतीने 2019 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची भारतीय संघात निवड केली. भारताच्या या संघात अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरला संधी मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

विश्वचषकासाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी रायडूची निवड जवळजवळ पक्की मानली जात होती. परंतू निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विजय शंकर हा त्रिआयामी खेळाडू [थ्री डायमेंशन खेळाडू(3D)] असल्याचे स्पष्ट करत त्याला रायडू ऐवजी निवडण्याचे कारण स्पष्ट केले.

त्यामुळे 3D या शब्दाचा वापर करत काल(16 एप्रिल) रायडूने मजेशीर ट्विट करुन निवड समीतीवर निशाणा साधला आहे. त्याने ट्विट करताना फनी इमोजीचा वापर करत म्हटले आहे की ‘विश्वचषक बघण्यासाठी 3डी (3D) चश्म्याचा एक सेट आत्ताच ऑर्डर केला आहे.’

रायडूने मागीलवर्षी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले होते. तसेच त्याने मागीलवर्षी एशिया कप स्पर्धेत आणि विंडीजविरुद्ध चांगला खेळ करत सर्वांना प्रभावीत केले. पण मात्र मागील काही दिवसांपासून त्याची कामगिरी खालवली आहे. त्यामुळे त्याला फटका बसल्याचेही अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

त्याच्याऐवजी शंकरची निवड करण्याबद्दल प्रसाद म्हणाले, ‘आम्ही रायडूलाही काही अधिक संधी दिल्या, पण विजय शंकर हा त्रिआयामी खेळाडू आहे. तो फलंदाजी करु शकतो, जर गरज लागली तर गोलंदाजी करु शकतो. तसेच तो क्षेत्ररक्षक आहे. आम्ही त्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहत आहोत. आता आमच्याकडे त्या जागेसाठी बरेचसे पर्याय आहेत.’

असा आहे 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार ), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक,केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर,रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा डिविलियर्स दुसराच क्रिकेटपटू

विश्वचषकात या भारतीय क्रिकेटपटूला गोलंदाजी करण्याची लसिथ मलिंगाला वाटते भीती

आयपीएलच्या मध्यावर मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का…