विश्वचषक २०१९ साठी पाकिस्तानचा १५ जणांचा संघ जाहीर

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी पाकिस्तानने आज(18 एप्रिल) 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरचा समावेश करण्यात आलेला नाही. पण विश्वचषकाआधी होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी मात्र 17 जणांच्या पाकिस्तान संघात त्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

त्याच्याप्रमाणेच आक्रमक फलंदाज असिफ अलीलाही विश्वचषकासाठीच्या 15 जणांच्या संघात संधी दिलेली नाही. पण त्याचाही इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी 17 जणांच्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे गरज पडली तर पाकिस्तान 23 मे पर्यंत या 15 जणांच्या संघात बदल करुन अमिर आणि अलीला विश्वचषकासाठीच्या अंतिम संघात संधी देऊ शकतात.

आयसीसीच्या नियमाप्रमाणे 23 एप्रिल पर्यंत प्राथमिक 15 जणांचा संघ जाहीर करण्याची अंतिम तारिख आहे. पण विश्वचषकाला 7 दिवस बाकी असे पर्यंत म्हणजेच 23 मेपर्यंत 15 जणांच्या संघात बदल करता येतील.

आज जाहीर झालेल्या पाकिस्तानच्या संघात अबीद अली याला पर्यायी सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे मोहम्मद हुसेन आणि शाहिन शाह आफ्रिदी या युवा वेगवान गोलंदाजांनाही संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक हे अनुभवी क्रिकेटपटूही पाकिस्तानच्या संघात असणार आहेत. हे दोघेही 2007 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाचे भाग होते. हाफिजचा विश्वचषक 2019 साठी जरी संघात समावेश करण्यात आला असला तरी तो सध्या आंगठ्याच्या दुखापतीतून सावरत आहे.

परंतू त्याच्या फिटनेसबद्दल पाकिस्तान निवड समीतीचे अध्यक्ष इंझमाम उल हक म्हणाले, ‘हाफिजने मागील 10 आठवड्यात कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही, पण तो कायम आमच्या योजनेमध्ये होता. त्याच्या फिटनेसबद्दल सांगायचे तर चांगली गोष्ट म्हणजे त्याने काल टेनिस बॉलने खेळायला सुरुवात केली आहे.’

‘तसेच त्याच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे क तो इंग्लंड दौऱ्याच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. आमचा विश्वचषकातील पहिला सामना विंडीज विरुद्ध 31 मे ला आहे. त्यामुळे त्यासाठी अजून सहा आठवडे आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे तो पूर्णपणे फिट होईल.’

पाकिस्तानने याआधी विश्वचषकासाठी 23 जणांचा संभाव्य संघ जाहीर केला होता. या 23 जणांपैकी मोहम्मद अब्बास, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, उस्मान शिनवारी आणि यासिर शहा यांना 15 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.

पाकिस्तान विश्वचषकाआधी इंग्लंड विरुद्ध 5 मे ते 19 मे पर्यंत 1 टी20 आणि 5 वनडे सामने खेळणार आहे. या मालिकांसाठी पाकिस्तानने विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला 15 जणांचा संघच कायम ठेवला असून यात फक्त मोहम्मद अमीर आणि असिफ अलीचा समावेश केला आहे.

असा आहे विश्वचषक 2019 साठी पाकिस्तान संघ – 

सर्फराज अहमद (कर्णधार, यष्टीरक्षक), अबीद अली, बाबर आझम, फहीम अशरफ, फकर जामन, हरिस सोहेल, हसन अली, इमाद वासीम, इमाम-उल-हक, जुनैद खान, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन शाह आफ्रिदी , शोएब मलिक.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकाच्या आधीच लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती?

विश्वचषक २०१९: असा आहे दक्षिण आफ्रिकेचा १५ जणांचा संघ; ताहीर, अमलाला मिळाली संधी

रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ