का मागितली अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची माफी

काल भारताने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्याच्या विजयाचा मानकरी ठरला तो भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक. 

या अटीतटीच्या झालेल्या सामन्यानंतर अनेकांनी भारताचे आणि कार्तिकचे कौतुक केले. यात जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून भारताचे अभिनंदन आणि कार्तिकच्या खेळीचे कौतुक केले. पण हे ट्विट करताना त्यांनी एक चूक केली. त्याचसाठी त्यांनी कार्तिकची माफी मागितली. 

झाले असे की काल कार्तिक जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताला विजयासाठी १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती. त्यावेळी त्याने आक्रमक खेळत फक्त ८ चेंडूंतच नाबाद २९ धावा केल्या. यात त्याने जेव्हा सामना जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती तेव्हा षटकार मारत भारताचा विजय निश्चित केला. 

याबद्दल ट्विट करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की “खूप रोमांचकारी सामना झाला. बांग्लादेशने चांगली लढत दिली. कार्तिक खूप चांगला खेळ केलास. शेवटच्या २ षटकात २४ धावा आणि नंतर १ चेंडू आणि ५ धावा असे समीकरण असताना कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. अविश्वसनीय! अभिनंदन भारताचे!”

यात अमिताभ यांनी २ षटकात २४ धावा असे लिहिले होते, पण खरे तर तिथे ३४ धावा असे हवे होते. याचबद्दल पुन्हा ट्विट करून अमिताभ यांनी कार्तिकची माफी मागितली.