टेलरने ज्या खेळाडूचा विक्रम मोडला त्याचीच मागितली माफी

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघात सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने पहिल्या डावात द्विशतकी खेळी केली. त्याचबरोबर कसोटीमध्ये 18 शतकांचा टप्पाही गाठला. त्यामुळे त्याने त्याचे मेंटोर दिवंगत मार्टिन क्रो यांच्या 17 कसोटी शतकांना मागे टाकले आहे.

यावेळी त्याने मार्टीन क्रो यांच्यासाठी प्रार्थना केली तसेच त्यांची माफीही मागितली आहे.

टेलरने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक करत क्रो यांनी केलेली भविष्यवाणी खरी करुन दाखवली आहे. क्रो यांनी म्हटले होते की टेलर त्यांच्या शतकांच्या विक्रमाला मागे टाकेल. क्रो यांचे दोन वर्षांपूर्वी 2017 मध्ये कॅन्सरने निधन झाले होते.

याबद्दल बोलताना टेलर म्हणाला, ‘मी या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी इतका वेळ घेतल्याने होगनची( क्रो) माफी मागितली आहे.’

‘ज्यावेळी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा 17 हा खूप मोठा आकडा होता. तिथे पोहचणे समाधान देणारे होते. पण त्यानंतर मी अपेक्षेप्रमाणे खेळलो नाही. कदाचीत हीच गोष्ट माझ्या डोक्यात चालू असेल.’

टेलरने आता न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अव्वल स्थानावर 20 शतकांसह केन विलियमसन आहे.

टेलरने या सामन्यात 212 चेंडूत 19 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 200 धावा केल्या. तसेच हेन्री निकोल्सनेही 107 धावांची आणि कर्णधार केन विलियमसनने 74 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने पहिला डाव 6 बाद 432 धावांवर घोषित करत 221 धावांची आघाडी घेतली. तसेच यावेळी पावसाचा व्यत्ययही येत होता.

 

त्यानंतर बांगलादेशने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 3 बाद 80 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून मोहम्मद मिथून आणि सौम्य सरकार नाबाद खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंतच्या त्या ३ चुका पहाच, ज्यामुळे कर्णधार कोहली चिडला

आकाश अंबानीच्या लग्नात हार्दिक पंड्या-करण जोहरने धरला ठेका

एवढी चांगली खेळी केलेल्या त्या खेळाडूचे नावच विसरला शिखर धवन