इनिएस्टाच्या चायनात खेळण्याच्या चर्चेला आज ६ वाजता लागणार विराम

स्पेनचा आधारस्तंभ आणि फुटबाॅल क्लब बार्सिलोनाचा कर्णधार आंद्रेस इनिएस्टा आज आपल्या भविष्याच्या नियोजनाबद्दल पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. गेल्या काही आठवड्यापासून इनिएस्टा चायनाच्या लीगमध्ये खेळणार अश्या चर्चेला उधाण आले आहे.

त्यामागे अजुन एक कारण म्हणजे इनिएस्टाचा वाईनचा उद्योग. त्याच्या वाईनचा चायनामध्ये प्रचंड प्रमाणात खप आहे आणि त्याच्या चायनामध्ये खेळल्याने उद्योगाला अजुन चालना मिळेल तसेच त्याच्या करारातसुद्धा त्याच्या वाईनच्या उद्योगाच्या प्रसिद्धीचे काही मुद्दे असतील असे मार्काया स्पॅनिश खेळाच्या वृत्तपत्राने एका बातमीत सांगीतले आहे.

मागील वर्षीच ६ ऑक्टोबर २०१७ रोजी इनिएस्टाने बार्सिलोनाबरोबर संपूर्ण आयुष्यासाठी करार केला होता. याच तारखेला १९९६ साली इनिएस्टाने बार्सिलोनासाठी आपला पहिला सामना खेळला होता. बार्सिलोनाच्या १४ वर्षाखालील ‘ब’ संघातर्फे हा सामना खेळण्यात आला होता.

इनिएस्टाने बार्सिलोतर्फे ६७० सामने खेळले असून त्यात एकूण ३१ विजेतेपदांचा समावेश आहे. त्यात ८ ला लीगा, ७ स्पॅनिश सुपर कप, ६ कोपा डेलरे, ४ चॅम्पियन्स लीग, ३ युरोपियन सुपर कप आणि ३ फीफा क्लब वर्ल्डकपचा समावेश आहे. तर इनिएस्टाने स्पेन तर्फे १२५ सामन्यात वर्ल्डकप आणि युरोपियन चॅम्पियनशिपया विजेतेपदांचा समावेश आहे.

इनिएस्टाने बार्सिलोना तर्फे नुकत्याच झालेल्या कोपा-डेलरेच्या अंतिम सामन्यात गोल केला होता. पुयोल, झ्यावी नंतर इनिएस्टाचे बार्सिलोना सोडून जाणे धक्कादायक असेल. पत्रकार परिषद भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.