नो-बॉल असतानाही अँजेलो मॅथ्यूजला का दिले बाद ??

दिल्ली। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात आज सकाळच्या सत्रात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला पंचांकडून चुकीचे बाद देण्यात आले.

भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा दुसऱ्या डावातील २२ वे षटक टाकत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यूजने बचावात्मक खेळण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेकडे झेल दिला. यावर पंचांनी त्याला बादही दिले परंतु नंतर हा चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे समजले.

आजकाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा खेळाडूला बाद दिले जाते तेव्हा शंका असेल तर पंच नोबॉल तपासून पाहतात. त्यासाठी पॅव्हिलिअनमध्ये जात असलेल्या खेळाडूला थांबवण्यात येते.

जेव्हा मॅथ्यूजला बाद देण्यात आले तेव्हा पंचांनी तो चेंडू नो बॉल आहे की नाही हे तपासले नसल्याने त्यांनी त्याला बाद दिले आणि त्यावर मॅथ्यूजनेही रिव्हू घेतला नसल्याने त्याला परतावे लागले.

मॅथ्यूजने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. श्रीलंका अजूनही २९१ धावांनी पिछाडीवर आहे. उपहारापर्यंत श्रीलंकेने ४ बाद ११९ धावा केल्या आहेत.