अशी आहे विश्वचषक २०१९साठी अनिल कुंबळेची १५ सदस्यीय टीम इंडिया

आयसीसीची 12 वी विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु होणार आहे. त्यामुळे आता पुढील एक ते दिड महिन्यात या विश्वचषकासाठी संघ जाहीर होतील. याचमुळे आता या विश्वचषकाच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. अनेक क्रिकेटतज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे संभाव्य संघही जाहीर केले आहेत.

यामध्ये आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेचाही समावेश झाला आहे. त्याने त्याचा विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ निवडला आहे. तसेच त्याने साधारण अंतिम 11 जणांचा संघ कसा असावा याबद्दलही मते मांडली आहेत.

कुंबळेने त्याच्या संघात रिषभ पंत, खलील अहमद या खेळाडूंनाही स्थान दिले असून त्याने अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजा ऐवजी विजय शंकरचा विचार केला आहे.

क्रिकेटनेक्स्टशी बोलताना कुंबळे म्हणाला, ‘मी ज्या 11 जणांची साधारण निवड केली आहे त्यात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा सामावेश आहे. हा आपला 11 जणांचा संघ असेल. हाच संघ अंतिम 11 जणांचा असेल असे नाही पण असा 11 जणांचा संघ असू शकेल.’

‘पण 12,13,14 आणि 15 क्रमांकाचे खेळाडू हे मोठे आव्हान आहे. मला वाटते की विजय शंकर किंवा रविंद्र जडेजा असावा. शंकर हा फलंदाज म्हणून चांगला आहे. पण गोलंदाजीमध्ये अजूनही त्याला संधी आहे. मला वाटत नाही की तूम्ही त्याच्यावर 10 षटके गोलंदाजी करण्यासाठी अवलंबून राहू शकता. त्यामुळे हे एक आव्हान आहे. मी विजय शंकरला निवडेल.’

त्याचबरोबर कुंबळेने शमी, भुवनेश्वर आणि बुमराह यांच्यासह युवा क्रिकेटपटू खलील अहमदचा वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय निवडला आहे. तसेच चहल आणि कुलदीप हे फिरकी गोलंदाज असतील, त्याचबरोबर केदार जाधव आणि हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून संघात असतील.

तसेच कुंबळेने विश्वचषकासाठी केएल राहुलचा तिसरा सलामीवीर म्हणून विचार केलेला नाही. त्याच्याऐवजी त्याने मधल्या फळीत ज्यादाच्या फलंदाजाला संधी दिली आहे. तसेच त्याने म्हटले आहे की पंत हा यष्टीरक्षणासाठीही चांगला पर्याय आहे.

असा आहे अनिल कुंबळेचा विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ –

विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, खलील अहमद, अंबाती रायडू, रिषभ पंत आणि विजय शंकर.

महत्त्वाच्या बातम्या-

अजिंक्य रहाणे म्हणतो, ती गोष्ट केली तर विश्वचषकासाठी संघातील स्थान पक्के…

आज गौतम गंभीरसह या चार खेळाडूंचा झाला पद्म पुरस्काराने सन्मान

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर