महिंद्रा “शिवसेना प्रमुख” चषक,तर विजय बजरंग व्यायाम शाळा “माँसाहेब” चषकाचे मानकरी

अभिषेक भोजने व्यावसायिक,तर गणेश तुपे वजनी गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू.

महिंद्राने अंकुर स्पोर्ट्स क्लब व डॉ. शिरोडकर विचार अमृतधारा आयोजित, मुं. शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाचा मान पटकावित विलास जाधव या आपल्या खेळाडूला त्याच्या ५०व्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली.

महिंद्राचे हे या मोसमातील पाचवे जेतेपद, तर मुंबईतील तिसरे. ५५किलो वजनी गटात हा मान विजय बजरंग व्यायाम शाळेने मिळविला. महिंद्राचा अभिषेक भोजने व्यावसायिक गटात, तर विजय बजरंगचा गणेश तुपे वजनी गटातील स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

दोन्ही खेळाडूंना (प्रत्येकी ) फ्रीज देऊन गौरविण्यात आले. लालबाग गणेश गल्ली येथील स्व.अनिल कुपेरकर क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने युनियन बँकेचे आव्हान ३२-२५ असे मोडून काढत रोख रु.एकावन्न हजार (₹५१,०००/-) व ” शिवसेना प्रमुख चषक” आपल्या नावे केला.

उपविजेत्या बँकेला चषक व रोख रु. एकतीस हजार (₹३१,०००/-)वर समाधान मानावे लागले. महिंद्राच्या अभिषेक भोजनेची पकड करीत बँकेने सुरुवात तर झोकात केली. अजिंक्य कापरेने चढाईत एकदा एक व नंतर २गडी टिपत बँकेची आघाडी वाढविली.

ओमकार जाधवने चढाईत बोनस अधिक एक गडी टिपत महिंद्राचे खाते उघडले. पण ९व्या मिनिटाला अजिंक्य कापरेने शिलकी २गडी टिपत महिंद्रावर लोण देत बँकेला ११-०४ अशी आघाडी मिळवून दिली. पण ती फार काळ टिकली नाही.

महिंद्राने १७व्या मिनिटाला या लोणची परत फेड करीत १४-१४अशी आपल्याकडे आघाडी खेचून आणली. येथून महिंद्राने मागे वळून पाहिले नाही. मध्यांतराला १८-१५ अशी महिंद्राकडे आघाडी होती. मध्यांतरा नंतर १४व्या मिनिटाला आणखी एक लोण देत महिंद्राने २९-२१ अशी आघाडी घेत बँकेच्या गोटातील हवाच काढून घेतली. महिंद्राकडून अभिषेक भोजने, स्वप्नील शिंदे, तर बँकेकडून अजिंक्य कापरे, नितीन भोसले यांनी सर्वांगसुंदर खेळ केला.

स्व.भालचंद्र सावंत क्रीडांगणावर झालेल्या ५५ किलो वजनी गटात विजय बजरंग व्या. शाळेने जय दत्तगुरुला ६९-४७असे पराभूत करीत ” माँ साहेब चषक व रोख रु.एकवीस हजार (₹२१,०००/-) आपल्या खात्यात जमा केले.

उपविजेत्या जय दत्तगुरुला चषक व रोख रु. अकरा हजार (₹११,०००/-)वर समाधान मानावे लागले. विजय बजरंगच्या गणेश तुपेने चढाईत २गडी टिपत आपला इरादा स्पष्ट केला.

चौथ्या मिनिटाला लोण देत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यांतराला ३४-२६अशी ८गुणांची आघाडी विजय बजरंगकडे होती. विजय बजरंगने या सामन्यात दत्तगुरुवर एकूण ५लोण चढविले. दत्तगुरुला अवघ्या एका लोणची परतफेड करता आली. १२बोनस गुण मात्र त्यांनी कमविले.गणेश तुपे, तेजस बुगडे यांचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. दत्तगुरुकडून आकाश उपाध्याय, दीपेश चव्हाण यांनी कडवी लढत दिली.

विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत महिंद्राने मध्य रेल्वेला ३४-२६असे, तर युनियन बँकेने देना बँकेला ४५-३४असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. या उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.दहा हजार प्रदान करण्यात आले.

५५किलो वजनी गटात विजय बजरंगने वारसलेनला ७५-४७ असे, तर जय दत्तगुरुने अशोक मंडळाला ४८-४३असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु.पाच हजार व चषक प्रदान करण्यात आला.

व्यावसायिक गटात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू म्हणून युनियन बँकेचा अजिंक्य कापरे, तर उत्कृष्ट पकडीचा खेळाडू म्हणून महिंद्राचा स्वप्नील शिंदे यांची निवड करण्यात आली. वजनी गटात हा मान जय दत्तगुरुच्या दीपेश चव्हाण(चढाई) व आकाश उपाध्याय(पकड) यांनी मिळविला. दोन्ही गटात चढाईच्या खेळाडूंना LED T/V देऊन , तर पकडीच्या दोन्ही खेळाडूंना होम थिएटर देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण विभागीय खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, महिंद्राचे प्रोडक्शन मॅनजर चव्हाण, अंकुरचें विश्वस्त अनिल घाटे यांच्या उपस्थितीत पार पडला.