जिल्हास्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत महिंद्रा, मध्य रेल्वे उपांत्य फेरीत

वारसलेन, विजय बजरंग, अशोक मंडळ, जय दत्तगुरु यांनी अंकुर स्पोर्ट्स क्लब व डॉ.शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या संयुक्त विद्यमान आणि मुं.शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने आयोजित ५५किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. तर महिंद्रा, मध्य रेल्वे, युनियन बँक आणि देना बँक यांनी विशेष व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली.

वारसलेन विरुद्ध विजय बजरंग व अशोक मंडळ विरुद्ध जय दत्तगुरु आशा ५५किलो वजनी गटात, तर महिंद्रा विरुद्ध मध्य रेल्वे व युनियन बँक विरुद्ध देना बँक अशा व्यावसायिक गटात उपांत्य लढती होतील. लालबाग, गणेश गल्ली येथील स्व. अनिल कुपेरकर क्रीडांगणावर झालेल्या वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात वारसलेनने शिवशक्तीला ५२-४६ असे नमविले.

सोहम नार्वेकर, प्रज्वल पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाने वारसलेनने पहिल्या डावात २९-१८अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात शिवशक्तीच्या आशिष शेंडे, निलेश सणस यांनी कडवी लढत दिली, पण संघाला मात्र ते विजयी करू शकले नाही.

दुसऱ्या सामन्यात अशोक मंडळाने विजय क्लबचा कडवा विरोध ४८-४०असा मोडून काढला. मध्यांतराला ३०-२१अशी आघाडी अशोक कडे होती. अशोकच्या संतोष ठाकूरने एका चढाईत ४गडी टिपत या विजयात महत्वाची भूमिका बजावली.त्याला ओमकार कामतेकरने चढाईत, तर हर्ष पवारने पकडीत तोलामोलाची साथ दिली. विजयकडून ऋतिक भोसले, आयुष साळवी यांचा खेळ उत्कृष्ट होता.

विजय बजरंग व्यायाम शाळेने गणेश तुपेच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर वंदे मातरमला ५५-४८असे पराभूत केले. विश्रांतीला दोन्ही संघ २६-२६असे समान गुणांवर होते.वंदे मातरम कडून अभिषेक जाधव छान खेळला. शेवटच्या सामन्यात जय दत्तगुरुने पिंपळेश्वरला ४७-१६असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली.

व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात महिंद्राने पश्र्चिम रेल्वेचा प्रतिकार ३०-१४ असा मोडून काढला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात महिंद्राकडे १२-११अशी आघाडी होती.

मध्यांतरानंतर महिंद्राच्या अभिषेक भोजने, अजिंक्य पवार यांनी जोरदार आक्रमण करीत, तर स्वप्नील शिंदेने धाडशी पकडी करीत हा सामना एकतर्फी केला. रेल्वेच्या पवनकुमार, रविकुमार यांना पूर्वार्धातील चमक उत्तरार्धात दाखविता आली नाही.

दुसऱ्या सामन्यात मध्य रेल्वेने सेंट्रल बँकेचा ४३-१६असा धुव्वा उडविला. पहिल्या डावात २५-१०अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम राखत हा विजय मिळविला. रेल्वेकडून श्रीकांत जाधव, आनंद पाटील यांच्या जोरदार चढाया तर गणेश बोडकेच्या पकडी या विजयास कारणीभूत ठरल्या. बँकेच्या रोहित अधटराव, आकाश अडसूल यांना या सामन्यात सूर सापडला नाही.

युनियन बँकेने न्यु इंडिया इन्शुरन्सचे आव्हान ५०-२२ असे सहज संपविले. मध्यांतराला २७-१२अशी आघाडी घेणाऱ्या बँकेने नंतर देखील तोच जोश कायम राखत हा विजय सोपा केला.

अजिंक्य कापरे,अजिंक्य पवार यांच्या धारदार चढाया, तर राजेश बेंदूर, नितीन गोगले यांचा भक्कम बचाव याला या विजयाचे श्रेय जाते. न्यु इंडिया च्या रोहित जाधव,सिद्धांत बोरकर यांचा खेळ आज त्यांच्या लौकिकाला साजेसा नव्हता.

शेवटच्या सामन्यात देना बँकेने मध्य रेल्वे विभागाला ४४-१५असे धुवून काढले. नितीन देशमुख,पंकज मोहिते यांच्या झंजावाती चढाया अणि संकेत सावंत याचा भक्कम बचाव याला या विजयाचे श्रेय जाते. रेल्वेचा अभिजित पाटील बरा खेळला.