औरंगाबादचा अंकित बावणे विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकला

बिलासपूर । आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राने महाराष्ट्राने उत्तर प्रदेश समोर ३४४ धावांचे लक्ष ठेवले आहे. महाराष्ट्राने ५० षटकांत ५ बाद ३४३ धावा उभारल्या असून त्यात अंकित बावणेने ११७ धावांची मोठी खेळी केली आहे.

या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय महाराष्ट्राच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवत मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ७३ चेंडूत ५६ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. विजय झोलला मात्र चांगली सुरुवात करूनही गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. तो २२ धावांवर बाद झाला.

कर्णधार राहुल त्रिपाठीने ४२ चेंडूत ३१ तर नौशाद शेखने फटकेबाजी करत ४७ चेंडूत ६९ धावा केल्या. यात खास लक्षात राहिली ती अंकित बावणेची खेळी. त्याने संयम आणि आक्रमण यांच्या जोरावर १०६ चेंडूत नाबाद ११७ धावांची खेळी केली. यात त्याने १३ चौकर आणि १ षटकार खेचला.

सध्या उत्तरप्रदेश १५.३ षटकांत ३ बाद ७८ धावांवर खेळत आहे.