गुरु-शिष्य आज आमने सामने

प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा म्हटले की अनुप कुमार हे समीकरण बनले आहे. मागील मोसमापर्यंत या समीकरणात रिशांक देवाडीगा देखील मुख्य घटक होता. प्रो कबड्डीचे पहिले चार मोसम रिशांक यु मुंबाचा महत्वाचा खेळाडू होता. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमासाठी फक्त एका खेळाडूला संघात रिटेन करता येत होते म्हणून अनुप कुमारला रिटेन कण्यात आले. रिशांकला ऑक्शनसाठी पाठवण्यात आले. रिशांकला यु.पी.योद्धा संघाने ऑक्शनमध्ये विकत घेतले.

यु मुंबासाठी खेळताना रिशांकची मेहनत आणि नवीन गोष्टी शिकण्याची धडपड यामुळे तो अनुप कुमारचा आवडता खेळाडू बनला होता. चौथ्या मोसमात यु मुंबाचा जवळजवळ सर्व संघ बदलला गेला होता पण रिशांकला अनुप कुमारने दुसऱ्या संघात जाऊ दिले नाही.

अनुप कुमारच्या मार्गदर्शनात तयार होणाऱ्या या खेळाडूकडे स्वतःची वेगळी शैली होती. त्याचबरोबर त्याला अनुपचे कौशल्य जवळून पाहता आले. याचा फायदा उचलत रिशांकने अनुपचे गुण आत्मसात केले. रिशांकला अनुप कुमारचा खेळातील वारसदार म्हणून कबड्डीतील पंडित पाहत होते.

या मोसमात रिशांक आणि अनुप कुमार वेगवेगळ्या संघात तर होतेच पण वेगळ्या झोनमध्ये देखील होते. त्यामुळे हे गुरु-शिष्य एकमेका विरुद्ध उभे राहणार नाहीत असे वाटले होते. पण प्रो कबड्डीच्या सामन्यांच्या नवीन रचनेमुळे हे गुरु -शिष्य एकमेका विरुद्ध उभे असणार आहेत.

अनुप कुमार आपल्या यु मुंबा संघासाठी या सामन्यात उतरेल तर रिशांक त्याच्या नवीन संघ यु.पी.योद्धासाठी सामन्यात उतरेल. हे गुरु -शिष्य या सामन्यात कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. रिशांक अनुपच्याच कौशल्याचा वापर करून हा सामना नवीन संघाला जिंकून देईल का अनुप नवीन डावपेचांसोबत या सामन्यात उतरून यु मुंबाला विजयी करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.