विराटला मिळाली सासऱ्यांकडून एक खास भेट

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाहाला आता जवळ जवळ दोन महिने झाले आहेत. पण तरीही ते बऱ्याचदा चर्चेत असतात. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार अनुष्काचे वडील कर्नल अजय कुमार यांनी विराटला एक खास भेट दिली आहे.

त्यांनी तेजस्विनी दिव्या नाईक यांचे ‘स्मोक अँड व्हिस्की’ हे पुस्तक विराटला भेट म्हणून दिले आहे. ३ फेब्रुवारीला या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे, या पुस्तक प्रकाशनासाठी अनुष्काचे पालक उपस्थित होते. त्या दरम्यान त्यांना नाईक यांचे काम आवडले. म्हणून त्यांनी पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून विराटला देण्याचा निर्णय घेतला.

या पुस्तकात नाईक यांच्या नात्यांवरील ४२ कवितांचा संग्रह आहे. या कवितांमध्ये त्यांनी नात्यांमधील चढउतार दाखवले आहेत.

विराट आणि अनुष्का या दोघांनाही कविता वाचायला आवडतात. त्यांनी त्यांच्या रिसेप्शनमध्येही भेट म्हणून सर्वांनी सुफी कवी रुमी यांचा काव्यसंग्रह दिला होता. विराट आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये इटली येथे कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला होता.

यानंतर विराट अनुष्काच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला आहे, तर अनुष्कानेही विराटच्या शतकी खेळीनंतर त्याचे कौतुक केले आहे. सध्या विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.