श्रीशांत मागची साडेसाती काही संपेना, पुन्हा बीसीसीआयकडून मोठे वक्तव्य !

कोची । जर एखाद्या पालक संघटनेने खेळाडूवर बंदी घातली असेल तर दुसऱ्या देशाकडून खेळू शकत नाही असे बीसीसीआयने स्पष्ट करत श्रीशांतच्या दुसऱ्या देशाकडून खेळण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

कालच एका खाजगी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत श्रीशांतने दुसऱ्या देशाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने आजीवन घातलेल्या बंदीवर केरळ उच्च न्यायालयाने निर्णय देताना बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे त्यामुळे श्रीशांत नवनवीन पर्यायांचा शोध घेत आहे.

श्रीशांत दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो अशा प्रश्नावर बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले सी. के. खन्ना म्हणाले, “आयसीसीच्या नियमांत असे स्पष्ट आहे की जर एखाद्या खेळाडूच्या पालक संघटनेने त्याच्यावर बंदी घातली असेल तर तो खेळाडू अन्य कुठल्याही देशाकडून खेळू शकत नाही.”

श्रीशांतने काल एका खाजगी न्यूजला मुलाखत दिली होती. त्यात तो म्हणाला, ” माझ्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे, आयसीसीने नाही. त्यामुळे मी दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो. माझे सध्या वय ३४ वर्ष आहे. माझ्यासमोर अजून ६ वर्षांची कारकीर्द आहे. “

“जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर तुम्हाला ते खेळायलाही आवडते. फक्त एवढेच नाही तर बीसीसीआय ही खाजगी संस्था आहे. केवळ आपण तिला भारतीय क्रिकेट संघ म्हणतो. त्यामुळे मी एखाद्या दुसऱ्या देशासाठी खेळलो तर ते असेच असेल. केरळ रणजी संघासाठी खेळणे ही वेगळी गोष्ट आहे. मला केरळकडून खेळायची इच्छा होती परंतु बीसीसीआयने मला तसे करू दिले नाही. ”

परंतु आता बीसीसीआयने पुन्हा पुढे येत यावर भाष्य करून श्रीशांतचे एकप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत खेळण्याचे सर्वच दोर कापले आहेत.