“महिला खेळाडूंसाठी अभिमानास्पद क्षण” अ‍ॅस्पेन वॉचेस तर्फे जस्ट वॉचेस येथे महिला क्रीडापटुंचा सन्मान

पुणे। एखाद्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांचे उदघाटन महिला खेळाडूंच्या हस्ते होणे व त्यासाठी आमची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती होणे हा आमच्यासाठी अभिमानस्पद क्षण आहे, असे छत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले

महिला शक्ती आणि महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अ‍ॅस्पेन वॉचेस तर्फे एका विशेष कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी भाग्यश्री कोलते, पूजा सहस्त्रबुद्धे, ऋतुजा सातपुते या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंसह महिला बुद्धिबळपटू व प्रशिक्षक मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, प्रिथा वर्टिकर, आणि महिला क्रिडा पत्रकार पूनम काटे यांचा गौरव करण्यात आला. अ‍ॅस्पेन हा कर्तृत्ववान महिलांचे प्रतिनिधित्व करणारा लेडीज वॉचेसचा एक लोकप्रिय ब्रँड असून वेस्टएंड मॉल, औंध येथील जस्ट वॉचेस या स्टोअरमध्ये झालेल्या एका शानदार समारंभात या सर्व कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते आपल्या ज्वेल्स या नव्या कलेक्शनचे अनावरण करण्यात आले.

जस्ट वॉचेसचे प्रमुख मनोज सुब्रमणियन म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताची मान उंच करणार्‍या या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याची संधी मिळणे, हा आमच्यासाठी बहुमान आहे. घड्याळांच्या विविध श्रेणीप्रमाणे क्रिडा क्षेत्रातील विविध श्रेणींवरही पुरुषांचे वर्चस्व आहे, तरीही या सर्व महिलांनी असामान्य कर्तृत्वाने आपला ठसा उमटविला आहे. म्हणूनच केवळ महिलांसाठी वाहून घेतलेल्या आमच्या अ‍ॅस्पेन या ब्रँडने खास महिलांसाठी घड्याळांची एक विशेष श्रेणी तयार केली असून आधुनिक विचारांच्या आणि फॅशनेबल अशा आपल्या परंपरा व संस्कृतीवर प्रेम करणार्‍या महिलांसाठी ही श्रेणी खास आकर्षण ठरेल.

यावेळी मृणालिनी कुंटे म्हणाल्या की, महिला खेळाडूंच्या हस्ते महिलांच्या नवीन घड्याळांचे अनावरण होणे हि खूपच अभिनव संकल्पना आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंनाही उत्तम यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळण्यास मदत होईल.

पूजा सहस्त्रबुद्धे म्हणाली कि, सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असून देशाचे नाव उज्वल करण्यास महिलांचाही मोठा वाटा असतो. आज विविध उद्योजकांच्या सहकार्यामुळेच खेळाडूंना आर्थिक पाठिंबा मिळतो व खेळाडूंमधील आर्थिक समस्येचे दडपण नाहीसे होते. साहजिकच खेळाडू निश्चिन्त मनाने व आत्मविश्वासाने खेळामध्ये भाग घेतो.

आंतरराष्ट्रीय सायकलपटू ऋतुजा सातपुते हिने सांगितले की, अशा सत्कारांमुळे आम्हांला अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

यावेळी उपस्थित असलेल्या विशेष महिला अतिथींमध्ये विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणार्‍या महिलांचा समावेश होता. त्यात भारतातील तिसर्‍या क्रमांकाची तिरंदाज व शिवछत्रपती पुरस्कार विजेती भाग्यश्री कोलते, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती टेबलटेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे, कुमार गटातील गुणवान खेळाडू आणि 16 वर्षाखालील गटातील महाराष्ट्रातील अव्वल मानांकित टेबलटेनिसपटू प्रिथा वर्टिकर, महिला ग्रॅन्डमास्टर व प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू ऋतुजा सातपुते आणि पुण्यातील महिला क्रीडापत्रकार पूनम काटे यांचा समावेश होता.

याप्रसंगी अ‍ॅस्पेन वॉचेस तर्फे ज्वेल्स या विशेष कलेक्शनचे अनावरण करण्यात आले. या कलेक्शनमध्ये अभिनव डिझाईन आणि ज्वेलरी यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या घड्याळांचा समावेश आहे.