एप्रिल हिट राईड : नाईट बीआरएम राईड 38 सायकलिस्टने केली पूर्ण

नाशिक । बीआरएम म्हणजेच फ्रेंच भाषेत ब्रेवे रँडोनर्स माँडियाॅक्स या उपक्रमातील 200 किमीची नाईट राईड शनिवारी रात्री (दि. 14-15) नाशिक शहरात राबविण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसात असलेली प्रचंड उन्हापासून बचाव व्हावा म्हणून सलग तिसऱ्या वर्षी एप्रिल महिन्यातील ही राईड रात्रीच्यावेळी काढण्यात आली. डॉ. महेंद्र महाजन नाशिक विभागात विविध बीआरएम राईड्सचे आयोजन करतात.

शनिवारी संध्याकाळी ६ वाजता मुंबईनाका येथून प्रारंभ करून – सोग्रास फाटा (चांदवड मार्गावरील) – नाशिक- घाटानेवारी मंदिर (नागपूर) – नाशिककडे परत असा राईडचा मार्ग होता. राईड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी 13.5 तास तासांची वेळ देण्यात आली होती. राईडला सुरुवात केलेल्या 40 पैकी 38 राइडर्सने रात्रभर राइड करत रविवारी (दि. 15) सकाळी 7.30 वाजेच्या आत राईड पूर्ण केली.

मुंबईचे रँडोनर सायकलिस्ट कबीर राचुरे, डॉ. महेंद्र महाजन यांनी केवळ सात तास 15 मिनिटात ही बीआरएम पूर्ण केली तर भारतीय आर्मीचे भारत पन्नू यांनी सात तास 30 मिनिटात राईड पूर्ण केली.

विशेष म्हणजे यात धुळ्याच्या एका जोडप्यासह एकूण 5 महिलांनी सहभाग घेत राईड पूर्ण केली आहे. दोन महिन्यापूर्वी सायकलिंग सुरु करणाऱ्या कल्याणी मोरे, डॉ. मनीषा रौंदळ, नीता नारंग, पल्लवी पवार, शारदा शितोळे या महिलांनी राईड पूर्ण करत इतर महिला सायकलिस्ट समोर आदर्श ठेवला आहे.

नाईट बीआरएम मध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रत्येक राईडला वाढत असल्याची नोंद असून नाईट बीआरएम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. हर्शल पवार, नितीन कोतकर आणि डॉ. नितीन रौंदळ यांन संपूर्ण राईड साठी मार्शलिंग केले.

संपूर्ण भारतातील बीआरएम AIR (ऑडेक्स इंडिया रॅंडनेयर्स) शी संलग्न असून फ्रान्समधील जगभरातील ब्रॅव्हट्सची देखरेख करणाऱ्या ACP (ऑडेक्स क्लब पेरिसिअन) शी संबंधित आहे.