मेस्सीने मिळवून दिले अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषकाचे टिकिट

अर्जेन्टिनाचा कर्णधार लियोनल मेस्सी याच्या हॅट्रीकच्या जोरावर अर्जेन्टिना संघाने पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात इक्वेडोर संघाचा ३-१ असा पराभव करत रशियामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. या सामन्यात अर्जेन्टिना कडून कर्णधार मेस्सीने तीन गोल केले तर इक्वेडोरसाठी रोमेरोने पहिल्या मिनिटालाच गोल केला होता.

सामन्याच्या सुरुवातीलाच अर्जेन्टिना संघाला धक्का बसला. सामना सुरु होऊन अवघे ४० सेकंद देखील झाले नाहीत तोपर्यंत इक्वेडोर संघाने गोल केला. त्यामुळे इक्वेडोर संघात आनंदाचे वातावरण तयार झाले. मागील दोन्ही सामन्यात अर्जेन्टिना संघ गोल करू शकला नव्हता त्यामुळे या सामन्यात अर्जेन्टिना संघ हरणार काय अशी शंका उपस्थितीत केली जाऊ लागली होती.

१२ व्या मिनिटाला मेस्सी आणि अँजेल डी मारिया यांनी लेफ्ट विंग वरून उत्तम चाल रचली आणि मेस्सीने योग्य दिशा देत अर्जेन्टिनासाठी पहिला गोल केला. या गोलमुळे अर्जेन्टिना सामन्यात तर परातलाच त्याच बरोबर विजय देखील त्यांच्या आवाक्यात दिसू लागला. १५ व्या मिनिटाला मेस्सीने सोलो रन केला, दोन -तीन डिफेंडर्सना चकमा देण्यात तो यशस्वी झाला परंतु गोलच्या खूप डावीकडे गेल्याने त्याला गोल करण्यासाठी उचित कोन मिळाला नाही. त्याने लगावलेला फटका इक्वेडोरच्या गोलकीपरने आरामात थोपवले.

२० व्या मिनिटला इक्वेडोरच्या प्लेयरच्या पायातून बाॅल काढून गोल जाळ्याच्या डाव्या बाजुला कोपऱ्यात जोरदार कीक मारुन मेस्सीने अर्जेंटिनाला १-२ अशी बढत मिळवून दिली. नंतर पूर्ण हाफ इक्वेडोरने बाॅल वर जास्त वेळ ताबा ठेवण्यात यश मिळवले पण त्यांना गोल करण्यात अपयश आले.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासून अर्जेंटिनाने सामन्याची गती कमी करायचा प्रयत्न केला. ६२ व्या मिनिटाला पेरेझच्या पास वर मेस्सीने २ इक्वेडोरचे डिफेंडर आणि गोलकीपरला चकवत बाॅलला हवेत अलगद मारत गोल केला आणि अर्जेंटिना कडून आपली ५ वी हॅट्रिक नोंदवत १-३ अशी अजेय बढत मिळवून दिली.

या विजयाबरोबर अर्जेंटिनाने विश्वचषकात थेट प्रवेश मिळवला. अर्जेंटीना बरोबर ब्राझील, उरुग्वे, कोलंबिया सुद्धा पात्र झाले तर पेरुला न्युझीलंड बरोबर सामना खेळावा लागेल आणि त्यातला विजेता पात्र होईल.

आपणास माहीत नसेल तर:
# मेस्सीने प्रथमच पहिल्या २० मिनिट मध्ये अर्जेंटिना कडून २ गोल केले.
# मेस्सीने साऊथ अमेरिका पात्रता फेरीच्या सामन्यात सर्वाधिक २१ गोल केले आहेत तर सुवारेझच्या नावावर २० गोल आहेत.
# आजचा तिसरा गोल मेस्सीचा अर्जेंटिनासाठी नंबर १० च्या जर्सी मधला ५० वा गोल होता.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)