एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुण्याच्या अर्जुन कढेचा दुसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथनवर सनसनाटी विजय

भारताच्या प्रजनेश गुणनेश्वरण, ससी कुमार मुकुंद यांचे विजय

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत पुण्याच्या अर्जुन कढे याने दुसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथनवर सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या जागतिक क्र.370 असलेल्या अर्जुन कढे याने जागतिक क्र.111असलेल्या रामकुमार रामनाथनचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून दिमाखात दुसरी फेरीत धडक मारली. अर्जुनने रामकुमारचे आव्हान 1तास 3मिनिटात मोडीत काढले.

सामन्यात अर्जुनने सुरुवातीपासूनच रामकुमारवर वर्चस्व राखले. पहिल्या सेटमध्ये अर्जुनने सहाव्या गेममध्ये रामकुमारची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 अशा फरकाने जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील अर्जुनने रामकुमारपेक्षा वरचढ खेळ केला.

या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे सामन्यात 2-2अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर अर्जुनने नेटजवळून आक्रमक खेळ करत रामकुमारची पाचव्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व आठव्या गेममध्ये 15-15असे गुण असताना अर्जुनने दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून दणदणीत विजय मिळवला.

कझाकस्तानच्या अलेक्झांडर नेदोव्हेसोव्ह याने ऑस्ट्रेलियाच्या मार्क पोलमन्सचा 6-2, 6-4असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

अन्य लढतीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जागतिक क्र.355 असलेल्या भारताच्या ससी कुमार मुकुंदने जागतिक क्र.265 असलेल्या साकेत मायनेनीचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(1)असा पराभव करून आगेकूच केली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये ससी कुमार मुकुंदने साकेत मायनेनीची आठव्या व दहाव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये ससी कुमार मुकुंदने साकेत मायनेनीची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व 12व्या गेमपर्यंत दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये ससी कुमार मुकुंदने साकेत मायनेनीची सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 7-6(1)असा जिंकून विजय मिळवला.

भारताच्या चौथ्या मानांकित प्रजनेश गुणनेश्वरणने तैपेईच्या सुंग-हुआ यांगचा 6-4, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम राखले. हा सामना 1तास 31मिनिटे चालला. अव्वल मानांकित मालदोवियाच्या राडू एल्बोटने भारताच्या सुमित नागलचा 7-5, 6-2असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हा तास 1तास 29मिनिटे चालला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):

अर्जुन कढे(भारत)वि.वि.रामकुमार रामनाथन(भारत)(2) 6-3, 6-2;

प्रजनेश गुणनेश्वरण(भारत)(4)वि.वि.सुंग-हुआ यांग(तैपेई) 6-4, 6-4;

ससी कुमार मुकुंद(भारत)वि.वि.साकेत मायनेनी(भारत) 6-4, 7-6(1);

राडू एल्बोट(मालदोविया)(1)वि.वि.सुमित नागल(भारत) 7-5, 6-2;

लुकास गेरच(जर्मनी)वि.वि.कोलीन अल्तामिरानो(यूएसए) 6-3, 6-1;

सेबस्तियन फॅसिलव(जर्मनी)वि.वि.स्कॉट ग्रिक्सपूर(नेदरलॅंड) 3-6, 6-3, 6-4;

फ्रेडरिको फरेरा सिल्वा(पोर्तुगल)वि.वि.बेंजमीन हसन(जर्मनी) 6-1, 6-2;

अलेक्झांडर नेदोव्हेसोव्ह(कझाकस्तान)वि.वि.मार्क पोलमन्स(ऑस्ट्रेलिया) 6-2, 6-4;

मावरीक बेन्स(ऑस्ट्रेलिया)वि.वि.फ्रान्सिस्को विलार्दो(इटली) 3-6, 6-4, 6-1;

बेन पेटल(इस्राईल)वि.वि.डॅनिलो पेट्रोविक(सर्बिया)5-7, 6-4, 6-4;