टी20 मुंबई लीगमध्ये खेळताना दिसणार अर्जून तेंडुलकर?

भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने टी20 मुंबई लीग स्पर्धेच्या लिलावासाठी नोंदणी केली आहे.

अर्जूनने मागील वर्षी या स्पर्धेतून माघार घेतली होती. पण यावेळी मात्र त्याने लिलावासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर सर्वांचेच लक्ष रहाणार आहे. तसेच त्याला या टी20 मुंबई लीग स्पर्धेच्या लिलावात कोणती फ्रांचायझी संघात सामील करुन घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अर्जूनने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने मागील वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच तो नुकताच डीवाय पाटील टी20 स्पर्धेत खेळाला आहे. यातही त्याने चांगली कामगिरी करताना मुंबईच्या 23 वर्षांखालील संघात स्थानही मिळवले आहे. तसेच अर्जूनने मुंबईकडून 14 वर्षांखालील, 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखाली संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या संघाकडून खेळताना वेळोवेळी अर्जूनने चांगली कामगिरीही केली आहे.

अर्जूनने त्याच्या गोलंदाजी शैलीवर अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. तसेच त्याने सचिन तेंडुलकरचा संघसहकारी आणि विदर्भाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी यांचेही मार्गदर्शन घेतले आहे.

टी20 मुंबई लीग ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होत असून मागील वर्षी या स्पर्धेचा पहिला मोसम पार पडला. पहिल्या मोसमाचे विजेतेपद मुंबई नॉर्थ इस्ट संघाने मिळवले होते. तसेच शिवम दुबे हा मालिकावीर ठरला होता.

या स्पर्धेत मागीलवर्षी मुंबई नॉर्थ, मुंबई नॉर्थ-वेस्ट, मुंबई नॉर्थ-इस्ट, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ-सेंट्रल आणि मुंबई साऊथ या सहा संघांनी भाग घेतला होता. तसेच मागील वर्षी अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी असे स्टार खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले होते.

ही स्पर्धा यावर्षी आयपीएल नंतर खेळवली जाण्याची शक्यता आहे. अजून या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

ती शर्यत नक्की जिंकणार कोण? रोहित, रैना की धोनी…

अशी आहे विश्वचषक २०१९साठी अनिल कुंबळेची १५ सदस्यीय टीम इंडिया

अजिंक्य रहाणे म्हणतो, ती गोष्ट केली तर विश्वचषकासाठी संघातील स्थान पक्के…