केवळ या ५ कारणांमुळे झाली अर्जून तेंडूलकरची भारतीय संघात निवड!

गुरुवारी अर्जुन तेंडुलकरची १९ वर्षाखालील भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जून हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा म्हणून सर्वांनाच माहित आहे. परंतू  त्याच्या १९ वर्षाखालील भारतीय संघात निवड होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल मात्र अनेकजण अनभिज्ञ आहेत.

६ फूटांपेक्षा जास्त उंची असलेला अर्जून अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्यम जलदगती गोलंदाज असून डाव्या हाताने गोलंदाजी करतो. तसेच तो खालच्या फळीत डाव्याहाताने फलंदाजी करतो.

अर्जुन मागील दोन वर्षांपासून अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या गोलंदाजी कौशल्यावर काम करत आहे. अतुल गायकवाड हे पुण्याचे असून बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ आहेत. त्यांना जरी प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव नसला तरी त्यांचे कौशल्य आणि मार्गदर्शनाचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही उपयोग करण्यात आला आहे.

अतुल गायकवाडांबरोबरच अर्जुन भारताचे माजी गोलंदाज सुब्रोतो बॅनर्जी यांचेही मार्गदर्शन घेत आहे. बॅनर्जी हे यावेळेसच्या रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ संघाचे गोलंदाजी मार्गदर्शक होते. याबरोबरच त्यांनी याआधी उमेश यादव आणि रजनीश गुरबानी या गोलंदाजांबरोबर काम केले आहे.

अर्जुनला 2016-17 मध्ये फ्रक्चर्स झाल्यामुळे त्याला त्याच्या वयोगटातील क्रिकेटला जवळ जवळ 10 महिने मुकावे लागले होते. त्याच्या या दुखापतीमुळे त्याला त्याची गोलंदाजीची शैली बदलावी लागली आहे.

त्यानंतर त्याने यावर्षी 19 वर्षांखालील कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 5 सामन्यात खेळताना 19 विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याने 2 वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी देखील केली होती. त्याचबरोबर याआधी त्याने 2017 ला बडोदा येथे झालेल्या जेवाय लेले इनव्हिटेशनल टूर्नामेंट स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती.

तसेच अर्जुन हा भारतातील आणि इंग्लंडमधील अनेक क्लबचा सदस्य आहे. तो लॉर्ड्सच्या इनडोअर अकादमीतही सराव करतो. त्याचबरोबर त्याने अनेकदा नेटमध्ये इंग्लंड संघाला गोलंदाजी देखील केली आहे. 

याबरोबरच अर्जुन हा भारतीय संघ मुंबईत असतो तेव्हा भारतीय फलंदाजांनाही बऱ्याचदा नेटमध्ये तो गोलंदाजी करताना दिसतो. विशेष म्हाणजे त्याने मागिल वर्षी पार पडलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी भारतीय महिलांबरोबर गोलंदाजी केली होती.

यावर्षी जानेवारीमध्ये अर्जूनने आॅस्ट्रेलियामध्ये ब्रॅडमन ओव्हल ग्राउंडवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून खेळताना हाँग काँग क्रिकेट क्लबविरुद्ध २७ चेंडूत ४८ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना ४ विकेट्सही घेतल्या होत्या.

तसेच जूलै 2017 मध्ये इंग्लंडमध्ये त्याने 19 वर्षाखालील नामिबिया संघाविरुद्ध एमसीसी संघाकडून 2 सामन्यात खेळताना 4 विकेट्स घेतल्या होत्या.

सध्या अर्जुन धरमशाला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या २५ खेळाडूंच्या सराव शिबीरात सहभागी झाला आहे. या शिबिरात त्याने युवा निवड समितीला त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे.

तसेच त्याच्या अत्तापर्यंतच्या कामगिरीने त्याची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. परंतू त्याला भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचे या दौऱ्यासाठी मार्गदर्शन मिळणार नाही. कारण सध्या द्रविड भारत अ संघाबरोबर इंग्लंडमध्ये आहे.

त्यामुळे भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी या दौऱ्यात भारताचे माजी फलंदाज डब्लूव्ही रामन हे मार्गदर्शन करणार आहेत.