या कारणामुळे अर्जुन तेंडुलकरने घेतली मुंबई टी२० लीगमधून माघार!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने या महिन्यात होणाऱ्या मुंबई टी २० लीगमधून माघार घेतली आहे. तो अजूनही त्याच्या खेळावर काम करत असल्याने त्याने सचिनबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सचिन या लीगचा ब्रँड अँबेसिडर आहे.

अर्जुनमुळे मुंबई लीगला चांगले वलय मिळाले होते परंतु त्याने आता माघार घेतली आहे. तसेच अनेक मुंबईचे मोठे खेळाडूही या लीगच्या दरम्यान दुसऱ्या स्पर्धांमध्ये व्यग्र असल्याने मुंबई टी २० लीगमध्ये भाग घेऊ शकणार नाही.

अर्जुन सध्या त्याच्या गोलंदाजी शैलीवर प्रशिक्षक अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्राने सांगितले आहे की, “अर्जुनची शारीरिक वाढ मागील काही वर्षात चांगली झाली आहे. तुम्ही त्याची ही वाढ प्रत्येक वर्षात बघू शकता आणि कदाचित त्यामुळेच त्याला सलग दोन स्ट्रेस फ्रॅक्चरला सामोरे जावे लागले आहे.

“त्यामुळे त्याला मागील जवळ जवळ एक वर्ष स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली आहे. त्याला संघर्ष करावा लागत आहे. सध्या तो गोलंदाजीचे मार्गदर्शन अतुल गायकवाड यांच्याकडून घेत आहे. ते त्याच्या गोलंदाजी शैलीवर काम करत आहेत.”

अर्जुनने मुंबई टी २० लीगमधून माघार घेण्याचा निर्णय त्याचे वडील सचिनशी चर्चा करून घेतला आहे. याविषयी सूत्रांनी सांगितले, “सचिनने त्याला सल्ला दिला की जर तो अजून स्पर्धेसाठी सज्ज नसेल तर त्याने लीग मध्ये खेळू नये. सचिनने त्याला सांगितले की ही लीग स्पर्धा कामगिरी करून दाखवण्यासाठी आहे यामध्ये त्याला गोलंदाजी सुधारण्याची संधी नाही.”

“त्याने प्रत्येक पाऊल योग्यवेळी टाकणे त्याच्यासाठी महत्वाचे आहे आणि त्याने तेव्हाच खेळावे जेव्हा त्याला त्याच्या नवीन गोलंदाजी शैलीबद्दल विश्वास असेल. अर्जुन आत्ताशी १८ वर्षाचा आहे. त्याला अजून खूप दूर जायचे आहे. अर्जुनने एमसीएला आज त्याच्या माघार घेण्याबद्दल कळवले आहे.”

ही मुंबई टी २० लीग ११ मार्च ते २१ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. ही लीग ६ संघांमध्ये रंगणार आहे. या लीगसाठीचा लिलाव शनिवारी बांद्रा हॉटेलमध्ये होणार आहे. प्रत्येक संघात जास्तीत जास्त १६-२० खेळाडू घेण्याची फ्रॅन्चायझींना परवानगी आहे.