वाचा कोणकोणत्या खेळाडूंची झाली खेलरत्नसाठी शिफारस !

आज क्रीडाजगतात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंच्या शिफारसी करण्यात आल्या. त्यात माजी भारतीय हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि पॅरालम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझारिया यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

निवड समितीच्या मते सरदार सिंग आणि देवेंद्र झाझारिया यापैकी एकाला किंवा संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जावू शकतो. याचा अंतिम निर्णय क्रीडा मंत्रालय घेणार आहे.

या वर्षी १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रीत कौर, पॅरालंपिक पदक विजेता मारिआप्पा थांगवालू आणि वरुण भाटी आणि गोल्फर एसएसपी चाव्रासिया यांचा समावेश आहे.

सरदार सिंग हे आधुनिक हॉकीमधील मधल्या फळीतील एक उत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सलग दोन वेळा रौप्य पदक मिळवून दिले आहे. २०१५ हॉकी विश्व लीगमध्ये भारताला ब्रॉंझपदक मिळवून देताना तो संघाचा कर्णधारही होता. २०१५ मध्ये त्याला भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दोन वेळचा पॅरालम्पिक सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाचीही खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. खेलरत्नसाठी शिफारस होणारा देवेंद्र झाझारिया हा पहिला पॅरालम्पिक विजेता आहे.

३६ वर्षीय झझरिया हा दोन पॅरालंपिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.