प्रो कबड्डी: पहा कालच्या सामन्यातील ही अप्रतिम हनुमान उडी

काल पटणा पायरेट्स आणि यु.पी.योद्धा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात यु.पी.योद्धा संघाने बऱ्यापैकी वर्चस्व प्रस्थापीत केले होते.पण शेवटी डुबकी किंग प्रदीप नरवाल याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा सामना बरोबरीत सुटला.

काल हा सामना पाहताना रेडींगमधील सर्व कौशल्य आपणास पाहावयाला मिळाले. त्यात नितीन तोमरचे ‘बोनस’ घेण्याचे तंत्र असो की प्रदीप नरवालची ‘डुबकी’. मोनू गोयत आणि रिशांकचे निसटून जाण्याची कला तर कधी ‘रनिंग हॅन्ड टच’ हे सर्व आपणाला काल पाहायला मिळाले. पण या सर्वांपेक्षा जास्त स्मरणात राहिली ती महेश गौड याची ‘हनुमान उडी’.
महेश गौडने काल खूप चांगला खेळ करत सहा गुण मिळवले. रिशांक देवाडीगा आणि नितीन तोमर संघात असताना देखील तो या सामन्यात छाप पाडण्यात यशस्वी झाला. महेशने खेळताना हनुमान उडी मारली होती. राइट कॉर्नर वरून डिफेंडर त्याला टॅकल करण्यासाठी आलेले असताना त्याने प्रसंगावधान ओळखून हनुमान उडी मारली. स्वतःला तर वाचवलेच शिवाय संघाला गुण देखील मिळवून दिला.

या हनुमान उडीने काल सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकात अचानक स्फुर्ती संचारली. प्रेक्षकांनी जल्लोष करून या कौशल्याची वाहवाही केली. हा सामना यु.पी.योद्धा आणि परिणामी महेशला जिंकता आला नसला तरी कालच्या हनुमान उडीने त्याने अनेक प्रेक्षकांची मने मात्र जिंकली.