Ashes 2017-18: दोन्ही संघांना विजयाची सामना संधी, दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत

ऍडलेड ओव्हल स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या ऍशेस सामन्यातील आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ बाद १७६ धावा केल्या आहेत. विजयासाठी इंग्लंडला अजून १७८ धावांची गरज आहे.

इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली होती परंतु सलामीवीर ऍलिस्टर कूकला मागील सामन्यांप्रमाणेच याही सामन्यात विशेष काही करता आले नाही. तो १६ धावांवर असताना नॅथन लीऑनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्याच्या पाठोपाठ सलामीवीर मार्क स्टोनमन (३६) मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाकरवी झेलबाद झाला.

त्यानंतर जेम्स विन्स आणि कर्णधार जो रूटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु विन्सही १५ धावांवर स्टार्कच्याच गोलंदाजीवर पीटर हॅंड्सकॉम्ब करवी झेलबाद झाला. या नंतर आलेल्या डेव्हिड मलानने रूटची थोडीफार साथ दिली पण ही जोडी तोडण्यात पॅट कमिन्सला यश मिळाले त्याने मलानला (२९) त्रिफळाचित केले.

कर्णधार रूट मात्र खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने ६७ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या साथीला ख्रिस वोक्स (५*) खेळत आहे.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने कालच्या दुसऱ्या डावातील ४ बाद ५३ धावांवरून पुढे खेळ सुरु केला. परंतु इंग्लंडच्या महान जलदगती गोलंदाज जिमी अँडरसन आणि वोक्स यांच्या भेदक गोलंदाजीने या डावात ऑस्ट्रेलियाला परत येऊ दिले नाही. त्यांनी या डावात मिळून ९ बळी घेतले.

काल नाबाद असणारी ऑस्ट्रेलियाची जोडी नॅथन लीऑन(१४) आणि पीटर हॅन्ड्सकॉम्ब(१२) हे लवकर बाद झाले. त्यांच्या नंतर आलेल्या फलंदाजांनाही विशेष काही करता आले नाही. शॉन मार्श(१९), टीम पेन(११), मिचेल स्टार्क(२०), पॅट कमिन्स(११*) आणि जोश हेझलवूड(३) यांनी धावा केल्या. ऑस्ट्रेलिया या डावात १३८ धावतच सर्वबाद झाली.

इंग्लंडकडून जिमी अँडरसन (५/४३),क्रेग ओव्हरटन (१/११) आणि ख्रिस वोक्स (३६/४) यांनी बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
ऑस्ट्रेलिया पहिला डाव:८ बाद ४४२ धावा (घोषित)
इंग्लंड पहिला डाव:सर्वबाद २२७ धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव: सर्वबाद १३८ धावा
इंग्लंड दुसरा डाव:४ बाद १७६ धावा
जो रूट (६७*) आणि ख्रिस वोक्स (५*) खेळत आहे.