Ashes 2017-18: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड दुसरा ऍशेस सामना मनोरंजक स्थितीत

ऍडलेड ओव्हल स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या ऍशेस सामन्यातील आज तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद ५३ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २२७ धावांवर सर्वबाद केले. हा दिवस रात्र कसोटी सामना खेळवला जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली झाली. सलामीवीर कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जॉनी बिस्ट्रॉव करवी झेलबाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळतील असे वाटत असतानाच अँडरसननेच उस्मान ख्वाजाला पायचीत बाद केले.

त्याच्या पाठोपाठ लगेचच सलामीवीर वॉर्नर १४ धावांवर जो रूट करवी ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या नंतर काही वेळातच ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथला ६ धावांवर वोक्सनेच पायचीत बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ५० अशी झाली होती.

स्मिथ बाद झाल्यावर नॅथन लीऑन(३*) नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरला आहे. त्याच्याबरोबर पीटर हॅन्ड्सकॉम्ब(३*) खेळत आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर २६८ धावांनी दुसऱ्या डावात पुढे आहे

तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात कालच्या १ बाद २९ धावांवरून सुरवात केली. परंतु सुरवातीलाच जेम्स विन्स(२) बाद झाला. त्याच्या पाठोपाठ लगेचच कर्णधार जो रूट झेलबाद झाला.

त्यानंतर डेव्हिड मलान (१९) आणि सलामीवीर ऍलिस्टर कूकने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात कूक ३७ धावांवर लीऑनच्या गोलंदाजीवर स्मिथ करवी झेलबाद झाला. त्यानंतर मात्र वोक्स(३६) आणि क्रेग ओव्हरटन(४१*) सोडलेतर बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. मोईन अली (२५), जॉनी बिस्ट्रॉव (२१),स्टुअर्ट ब्रॉड(३) आणि जेम्स अँडरसन (०) यांनी धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया कडून नॅथन लीऑन (४/६०), मिचेल स्टार्क(३/४९),जोश हेझलवूड(१/५६) आणि पॅट कमिन्स(२/४७) यांनी बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाला २१५ धावांची आघाडी मिळवून दिली.

संक्षिप्त धावफलक:
ऑस्ट्रेलिया पहिला डाव: ८ बाद ४४२ धावा (घोषित)
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद २२७ धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव: ४ बाद ५३ धावा
नॅथन लीऑन(३*) आणि पीटर हॅन्ड्सकॉम्ब(३*) खेळत आहेत.