नेहराजी बनणार या मोठ्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक

भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या आयपीएल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्याच्याबरोबरच या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळतील.

नेहराला याआधी प्रशिक्षणपदाचा कसलाही अनुभव नसला तरी तो आयपीएलमध्ये ५ संघांकडून खेळला आहे. याचा त्याला प्रशिक्षक म्हणून काम करताना फायदा मिळेल. नेहरा मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सहारा पुणे वॉरियर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघांकडून खेळला आहे.

त्याने १ नोव्हेंबर २०१७ ला दिल्लीमधील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. नेहराने १८ वर्षांच्या कारकिर्दीत १६४ सामने खेळताना २३५ बळी घेतले आहेत.

त्याच्याबरोबर फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी निवड झालेले गॅरी कर्स्टन पुन्हा एकदा आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करत आहेत. यांनी याआधी २०१४ आणि २०१५ च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक पद भूषवले आहे. त्यांनी २०१४ला दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत ३ वर्षांचा प्रशिक्षक पदासाठी करार केला होता, परंतु २०१४ आणि २०१५ मध्ये दिल्ली संघ गुणतालिकेत अनुक्रमे आठवा आणि सातवा राहिला त्यामुळे त्यांना २०१५ नंतर प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आले होते.

आयपीएलमध्ये जरी कर्स्टन यांचा प्रशिक्षणाचा अनुभव वाईट असला तरी त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून असणारा अनुभव दांडगा आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक असताना या दोन्ही संघांना कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिलेले होते. या बरोबरच २०११ साली भारताच्या विश्वचषक विजयातही त्यांचा प्रशिक्षक म्हणून मोलाचा वाटा होता.

बंगलोर संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी आपल्या पदावर कायम राहणार आहे. व्हिट्टोरीने चार वर्षांपूर्वी बंगलोरच्या प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेतली होती.

आयपीएल संघांना त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम राहणार आहेत त्यांची नावे हे जाहीर करण्याची ४ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. बंगलोर संघ कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे.