दिल्लीच्या टी २० सामन्यात येणार विघ्न ?

दिल्ली। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर १ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यात वीजपुरवठा संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा सामना रात्री खेळवला जाणार असल्याने स्टेडिअमवर प्रकाशाची गरज असते. परंतु दिल्ली सरकारने डिझेलवर चालणाऱ्या जेनेरेटरमुळे प्रदूषण होऊ नये म्हणून बंदी घातली असल्याने स्टेडिअमच्या विजेच्या खांबांना मिळणारा वीजपुरवठा कसा करणार हा प्रश्न सध्या दिल्ली क्रिकेट बोर्डला सतावत आहे. स्टेडिअमला बऱ्याचदा डिझेलवर चालणाऱ्या जेनेरेटरने वीजपुरवठा केला जातो.

पर्यावरण प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण प्राधिकरणाने दिल्ली क्रिकेट बोर्डाला या विषयी नुकतेच पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता दिल्ली क्रिकेट बोर्डाचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेले माजी न्यायाधीश विक्रमजीत सेन यांना विजापुरवठ्यासाठी वेगळा पर्याय शोधावा लागणार आहे.

माजी न्यायाधीश विक्रमजीत सेन यांनी बॉम्बे सबअर्बन इलेक्ट्रिक सपलायच्या (बीएसईएस) अध्यक्षांना पर्यायी विजापुरवठ्याबाबत विनंती केली आहे. ती विनंती मान्य करून १८०० केवीए वीज पुरवठा केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. परंतु तरीही अजूनही १८०० केवीए इतक्या विजेची गरज आहे.

पर्यावरण प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण प्राधिकरणाचे दिल्ली क्रिकेट बोर्डाला आलेल्या पत्रात असे म्हणणे आहे की त्यांनी डीआयएससीओएमएसशी आणि दिल्ली पॉवर सेक्रेटरींशी चर्चा केली आहे. त्यानुसार शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नसल्याने जनरेटरची गरज भासणार नाही असेही स्पष्ट केले आहे. 

डीआयएससीओएमएसला विनंती केल्यावर ते जास्तीची वीज पुरवतील. त्यांनी जर विनंती नाकारली तर आम्ही ते वीज पुरवतील हे ग्राह्य धरण्याआधी आम्हाला कळवा असे पर्यावरण प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याच बरोबर त्यांनी पर्याय म्हणून जनरेटर वापरण्याची परवानगी दिली आहे परंतु त्यांच्या मते त्याची गरज पडणार नाही.

डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरवर राजधानी दिल्ली येथे १७ ऑक्टोबर पासून ते १५ मार्च २०१८ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा अंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच तो या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे सांगितले होते.