फ्रेंच ओपन २०१९: ऍश्ले बार्टीला विजेतेपद; ऑस्ट्रेलियाची ४६ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात

शनिवारी(8 जून) फ्रेंच ओपन 2019 स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टी विरुद्ध चेक रिपब्लिकच्या मार्केटा वोंडरुसोवा या दोघींमध्ये पार पडला. या सामन्यात बार्टीने एकतर्फी विजय मिळवत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले.

1 तास 10 मिनीटे चाललेल्या या सामन्यात बार्टीने मार्केटाचा 6-1,6-3 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभव केला. याबरोबरच ती 1973 नंतर फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवणारी पहिली ऑस्ट्रेलियन टेनिसपटू ठरली आहे. याआधी मार्गरेट कोर्टने 1973 मध्ये फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले होते.

विशेष म्हणजे बार्टी व्यावसायिक क्रिकेटही खेळली आहे. तिने 2015 मध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी टेनिसमधून ब्रेक घेतला होता. ती महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळली आहे.

विजयानंतर बार्टी म्हणाली, ‘हे अविश्वसनीय आहे. मी आत्ता निशब्द झाली आहे. मी आज परिपूर्ण सामना खेळले. मला माझा आणि माझ्या टीमचा अभिमान आहे. हे दोन आठवडे खूप चांगले होते.’

तसेच उपविजेती ठरलेली 19 वर्षीय मार्केटा म्हणाली, ‘तूझे(बार्टी) आणि तूझ्या टीमचे अभिनंदन. तू मला शिकवण दिली आहेस. जरी मला आज विजय मिळालेला नसला तरी मी खूश आहे.’

23 वर्षीय बार्टीने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

यावर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये बार्टीने उपांत्य सामन्यात 17 वर्षीय अमांडा अनिसिमोवाला 6-7,6-3,6-3 असे तीन सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर मार्केटाने उपांत्य सामन्यात ब्रिटनच्या जोहान कोंटाला 7-5, 7-6 अशा फरकाने पराभूत केले होते आणि अंतिम फेरी गाठली होती.

महिला एकेरीची नवीन क्रमवारी पुढील आठवड्यात जाहिर होणार आहे. या क्रमवारीत बार्टी आता दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल. अव्वल क्रमांकावर नाओमी ओसाकाच कायम राहिल.