महिला बिग बॅश लीग: या खेळाडूने १० षटकारांसह ४७ चेंडूत केले शतक साजरे !

आज पासून सुरु झालेल्या महिला महिला बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एश्लेई गार्डनरने सिडनी सिक्सर्स कडून खेळताना मेलबर्न स्टार्स विरुद्ध १० षटकारांच्या मदतीने ५२ चेंडूत ११४ धावा केल्या आहेत. याबरोबरच या लीगमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही तिने केला आहे.

गार्डनरने ४७ चेंडूंतच आपले शतक पूर्ण केले होते. तिने तिच्या ११४ धावांच्या शतकी खेळीत ९ चौकार तर १० षटकार मारले आहेत.

तसेच तिची संघ सहकारी एलिस पेरीने देखील ४९ चेंडूत ९१ धावांची आक्रमक नाबाद खेळी केली. पेरीने या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. या दोघींनी १५० धावांची भागीदारी रचली.

या दोघींच्या आक्रमक खेळींच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने २० षटकात २४२ धावा केल्या. तसेच मेलबर्न स्टार्सला १५६ धावत रोखून ८६ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान पेरीचा षटकार मारलेला एक चेंडू स्टँडमधील एका चाहत्याला झेल पकडताना लागला. त्याच्यावर त्वरित प्रथोमोपचार करण्यात आले.

तसेच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. डाव संपल्यावर पेरी त्याला भेटण्यासाठी गेली होती.

या सामन्यात मेलबर्न स्टार्स कडून लिझेल ली हिनेदेखील आक्रमक फलंदाजी करताना ३६ चेंडूत ६४ धावा केल्या.

परंतु बाकीच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ न मिळाल्याने त्यांच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला.