कसोटी मालिकेत आर अश्विन आहे टिम इंडियाचे महत्त्वाचे अस्त्र

अॅडलेड। भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे 6-10 डिसेंबर दरम्यान खेळला जाईल.

ही मालिका सुरु होण्याआधी पत्रकारांशी बोलताना भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने सांगितले आहे की फिरकी गोलंदाज आर अश्विन हा भारतीय संघाला यश मिळवून देण्यात महत्त्वाता वाटा उचलेल.

पुजारा म्हणाला, ‘जर तूम्ही त्याची सध्याची गोलंदाजी पाहिली, तर मला वाटते की त्याने खूप बदल केले आहेत. पण मी ते बदल काय आहेत हे आत्ता मीडियासमोर सांगू शकत नाही. पण त्याने केलेले बदल त्याला मदत करतील.’

‘तो इंग्लंडमध्ये बरेच क्रिकेट खेळला आहे. नक्कीच तेथील परिस्थिती वेगळी आहे, जी फिरकी गोलंदाजांना जास्त मदत करत नाही. त्यामुळे मला वाटते जेव्हा तो आॅस्ट्रेलियात खेळेल, तेव्हा त्याला काय करायचे हे माहित असेल.’

‘त्याने 2015 मध्येही येथे कसोटी मालिका खेळली आहे. त्यामुळे यावेळी त्याच्याकडे आत्मविश्वास आहे आणि जे काही बदल करायचे होते ते त्याने केले आहेत.’

तसेच अश्विन चतूर गोलंदाज असून फलंदांच्या मनातील गोष्ट तो ओळखू शकतो, असेही पुजाराने म्हटले आहे.

अश्विनने मागील 2014-15 च्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात 3 सामन्यात 12 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

त्याचबरोबर भारतीय संघाने ही कसोटी मालिका सुरु होण्याआधी आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान सराव सामना खेळला आहे. हा सामना अनिर्णित राहिला.

या सामन्याबद्दल बोलताना पुजारा म्हणाला,  ‘सराव सामन्यातून आम्हाला जे हवे होते ते आम्हाला मिळाले. तसेच ट्रेनर आणि फिजीओ हे आमच्यावर लक्ष ठेऊन आहेत. आम्ही असा विचार केला की आज (3 डिसेंबर) विश्रांती घ्यावी आणि पुढचे दोन दिवस सराव करावा, ज्यामुळे आम्ही कसोटी सामन्यासाठी ताजेतवाने राहू.’

या सराव सामन्यात आॅस्ट्रेलिया एकादश संघाने पहिल्या डावात 544 धावांचा डोंगर भारतीय संघासमोर उभा केला होता.

याबद्दल बोलताना पुजारा म्हणाला, ‘500 पेक्षा जास्त धावा जरी सराव सामन्याक प्रतिस्पर्धी संघाने केल्या असल्या तरी त्याने काही फरक पडत नाही. आम्ही त्याबद्दल जास्त काळजी करत नाही. आमच्या गोलंदाजांना त्यांना काय करायचं आहे, हे माहित आहे. तसेच आॅस्ट्रेलियामध्ये गोलंदाजी करताना काय लाईन आणि लेन्थ हवी ते त्यांना माहित आहे.’

‘आम्ही सिडनीमधील तीन दिवसाचा चांगला उपयोग केला आहे. आम्ही सराव सामना सुरु असताना नेटमध्ये सरावही केला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की ही काळजीची गोष्ट आहे. आम्ही चांगला सराव केला आहे आणि आम्हाला जे हवे होते ते केले आहे.’

तसेच भारतीय संघ सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असून आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत हे स्थान कायम राखण्याचे भारतासमोर आव्हान आहे. याबद्दल पुजारा म्हणाला, ‘अव्वल क्रमांकाचा कसोटी संघ म्हणून आम्ही नेहमीच प्रत्येक सामना आणि मालिका जिंकण्याचा विचार करतो. यावेळीही वेगळे काही नसेल.’

‘आम्हाला नक्कीच मालिका जिंकायची आहे. पण आम्ही एका वेळी एका सामन्याचाच विचार करु. भारतामध्ये आम्ही चांगले खेळलो आहे. पण जेव्हाही आम्ही परदेश दौरा करतो तेव्हा आणखी चांगली कामगिरी करण्याची आमची प्रेरणा असते. आम्ही भारताबाहेरही सध्या चांगले क्रिकेट खेळत आहोत. तसेच ही आमच्या संघासाठी चांगली कामगिरी करुन दाखवण्याची उत्तम संधी आहे.’

तसेच पुजाराने भारताकडे चांगले वेगवान गोलंदाजीचे आक्रमण आहे, असेही म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अॅडलेड कसोटीत टिम इंडियाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी आहेत या चार खेळाडूंचे पर्याय

विराटला गोलंदाजी करताना पाहून गोंधळलेल्या यष्टीरक्षक पंतला पडला हा प्रश्न

किंग कोहलीचा निर्धार पक्का, मालिका जिंकणारच

अॅडलेड कसोटीत भारतीय फलंदाजांसाठी ही गोष्ट ठरु शकते धोकादायक