हरभजन अश्विनपेक्षा आक्रमक गोलंदाज- मॅथ्यू हेडन !

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने मॉर्डन क्रिकेटवर बोलताना भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि हरभजन सिंग यांच्याबद्दलची मते व्यक्त केली आहेत. त्यात त्याने अश्विन हा अभूतपूर्व गोलंदाज आहे आहे असेही म्हटले आहे पण त्याचबरोबर हरभजनला जलदगती गोलंदाजांकडून जास्त मदत मिळत नसल्याने त्याच्यावरची जबाबदारी जास्त होती असे म्हटले आहे.

अश्विनने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये जलद ३०० बळी घेण्याचा डेनिस लिली यांचा विक्रम मोडला आहे. त्याने ५४ सामन्यात ३०० बळी घेतले आहेत.

हेडन हा हरभजन विरुद्ध खेळला आहे तसेच त्याने चेन्नई सुपर किंग्स संघात असताना अश्विनलाही बघितले आहे. या दोन गोलंदाजांविषयी बोलताना हेडन म्हणाला, “माझ्या मते आकडेवारी कधी कधी खोटे सांगते, पण अश्विनची काही आकडेवारी अशी आहे जी त्याची महानता सिद्ध करते ,जर अश्विन अजून पाच वर्षे खेळाला तर तो या काळातील एक महान गोलंदाज बनेल त्याची हरभजनसारखी कौशल्ये आहेत जी चांगली आहेत, पण तो हरभजन सारखा आक्रमक ऑफ स्पिनर नाही”

याबरोबरच ही तुलना या दोन गोलंदाजांना बाकीच्या गोलंदाजांकडून मिळणाऱ्या मदतीवरून आहे. हे सांगताना हेडन म्हणाला, “पण अश्विनला हरभजनसारख्या आक्रमणाची गरज नाही. त्याची संघातील भूमिका ही माझ्या काळात असणाऱ्या जलदगती गोलंदाजांपेक्षा आत्ताचे जलदगती गोलंदाज काही प्रमाणात चांगले असल्याने योग्यप्रकारे ठरलेली आहे. संघात भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहसह दुसरा फिरकी गोलंदाज जडेजा आहे. त्यामुळे अश्विन त्याची भूमिका यशस्वीपणे बजावतो”

“माझ्या विचारानुसार हरभजन त्याच्या काळात एक प्रबळ गोलंदाज होता आणि विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्ध. त्यामुळे जर हरभजनने बळी मिळवले नाहीत तर भारताला संघर्ष करावा लागे. मला नाही वाटत की व्यंकटेश प्रसाद हा कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज होता. माझ्या मते हरभजन एकटा मुख्य भूमीका बजावणारा होता.”

“पूर्ण सन्मान ठेवून सांगतो आहे, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे उत्कृष्ट कसोटी गोलंदाज होते. पण आत्ताच्या गोलंदाजांशी त्यांची तुलना केली तर आत्ताचे गोलंदाज त्यांच्यापेक्षा जास्त सरस आहेत.”

याचबरोबर हेडनने आत्ताच्या काळातील फॅब फॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली, केन विलिअमसन, स्टिव्ह स्मिथ आणि जो रूट यांच्याबद्दल बोलताना म्हणाला हे आपापल्या वेगळ्या पद्धतीने महानतेकडे जात आहेत.