एशिया कप २०१८: मुशफिकूर रहिमचे दमदार शतक; बांगलादेशची विजयी सुरुवात

दुबई। शनिवार, 15 सप्टेंबरपासून एशिया कप 2018 स्पर्धेला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. बांगलादेशकडून मुशफिकूर रहिमने शतक केले आहे.

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला विजयासाठी 262 धावांचे आव्हान दिले होते. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची फलंदाजी कोलमडली. त्यांनी सुरुवातीलाच पहिल्या 10 षटकांच्या आत 4 विकेट्स गमावल्या होत्या.

त्यानंतर दसुन शनका(7) आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने(16) डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतू शनका धावबाद झाला. त्याच्या पाठोपाठ मॅथ्यूजनेही विकेट गमावली. त्यामुळे श्रीलंकेची आवस्था 6 बाद 63 धावा अशी झाली होती.

यानंतर दिलरुवान परेरा आणि सुरंगा लकमलने(20) थोडीफार लढत दिली पण तेही लवकर बाद झाले. दिलरुवान परेरानेच श्रीलंकेकडून सर्वाधिक 29 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ सलामीवीर उपुल थरंगाने 27 धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांनी थोडीही लढत न देता नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

बांगलादेशकडून मरशरफ मोर्तझा(2/25), मुस्तफिजूर रेहमान(2/20) आणि मेहदी हसन(2/21), शाकिल अल हसन(1/31), रुबेल हुसेन(1/18) आणि मुसद्दक हुसेन(1/8) यांनी विकेट घेत श्रीलंकेला 35.2 षटकात 124 धावांवर रोखले.

तत्पुर्वी, बांगलादेशने रहिमने केलेल्या शतकी खेळीच्या आणि मोहम्मद मिथूनने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर 49.3 षटकात सर्वबाद 261 धावा केल्या.

बांगलादेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मंलिगाने पहिल्याच षटकात दोन विकेट घेत बांगलादेशला सुरुवातीलाच जोरदार धक्के दिले.

त्यातच दुसऱ्या षटकात फॉर्ममध्ये असणाऱ्या बांगलादेशाचा सलामीवीर फलंदाज तमीम इक्बालला(2*) हाताला चेंडू लागला. यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. मात्र त्यानंतर रहिम आणि मिथूनने शतकी भागीदारी रचली.

रहिमने 150 चेंडूत 144 धावा करताना 11 चौकार आणि 4 षटकार मारले. तर मिथूनने 68 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 63 धावा केल्या. ही जोडी फोडण्यात मलिंगालाच यश आले. त्याने मिथूनला कुसल परेराकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर मात्र मदमुद्दलाह(1) आणि मुसद्दक हुसेन(1) यांनी लगेचच विकेट गमावल्या. तर मेहदी हसन(15), कर्णधार मशरफ मोर्तझा(11), रुबेल हुसेन(2) आणि मुस्ताफिजूर रेहमानने(10) लवकर विकेट गमावल्या.

बांगलादेशचा संघ 9 बाद 229 धावांवर असताना अचानक मनगट फ्रॅक्चर असतानाही इक्बाल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी त्याने एकाच हाताने फलंदाजी केली. तसेच त्याने धावा जरी काढल्या नसल्या तरी रहिमला भक्कम साथ दिली आणि त्याच्याबरोबर 32 धावांची भागीदारीही रचली.

अखेर थिसरा परेराने रहिमला बाद करत बांगलादेशचा डाव 261 धावांवर संपुष्टात आणला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

प्रीमियर लीग: लीव्हरपूलची विजयी घोडदौड सुरूच

भारताच्या या हॉकीपटूचे नाव आढळले नाडाच्या यादीत

एशिया कप २०१८: भारतीय संघाच्या मदतीसाठी दुबईला जाणार हे गोलंदाज