टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

उद्यापासून(15 सप्टेंबर) संयुक्त अरब अमिरातीमध्ये एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहेत.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. यावर्षी या स्पर्धेत सहा संघ खेळणार आहे. यात भारत, पाकिस्तान. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघाचा समावेश आहे.

यातील हाँग काँग या संघाला अजूनही आयसीसीचा वनडे क्रिकेटचा दर्जा नाही. असे असले तरी मात्र आयसीसीच्या नवीन नियमानुसार या स्पर्धेतील त्यांचे सामने अधिकृत वनडे सामन्यांमध्ये गणले जाणार आहेत.

या स्पर्धेबद्दलच्या या खास ऐतिहासिक गोष्टी-

– पहिली एशिया कप स्पर्धा 1984 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा येथे पार पडली होती. यावेळी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली होती. ज्यात जो संघ सर्वाधिक विजय मिळवेल तो विजेता अशी ही पद्धत होती. या पहिल्या स्पर्धेत भारताने सुनील गावस्करांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते.

– 1986 मध्ये झालेल्या दुसऱ्या एशिया कपमधून भारताने माघार घेतली होती. कारण त्या स्पर्धेचे यजमान असणारे श्रीलंका यांच्याबरोबरचे भारताचे क्रिकेट संबंध त्यावेळी बिघडले होते. यास्पर्धेत बांगलादेशनेही सहभाग घेतला होता. तर श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.

– तिसरी एशिया कप स्पर्धा 1988 ला बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. यावेळी भारताने श्रीलंकेवर अंतिम सामन्यात मात करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

– 1990 ला झालेल्या एशिया कप स्पर्धा भारतात खेळवली गेली. या स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली होती. कारण त्यावेळी भारत-पाकिस्तान या दोन देशात राजकीय संबध बिघडले होते. या स्पर्धेतही भारताने श्रीलंकेवर अंतिम फेरीत मात करत तिसरे विजेतेपद पटकावले.

– यानंतर 1993 ला होणारी एशिया कप स्पर्धा भारत-पाकिस्तान यांच्यातील कटू संबधांमुळे रद्द करावी लागली.

-1995 ला पुन्हा एकदा ही स्पर्धा शारजामध्ये झाली. मात्र या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात राउंड रॉबिन फेरीत सारखे गुण झाल्याने सर्वोत्तम रन रेटच्या जोरावर अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका संघांनी प्रवेश केला. या स्पर्धेत भारताने चौथे विजेतेपद मिळवले.

– यानंतर 1997 ला झालेल्या स्पर्धेत मात्र यजमान श्रीलंकेने भारतावर मात करत दुसऱ्यांदा एशिया कपचे विजेतेपद मिळवले.

– 2000 चा एशिया कप भारतासाठी खराब ठरला. भारत या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला. यावेळी पाकिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत पहिल्यांदाच एशिया कपवर नाव कोरले.

– 2004 च्या एशिया कपपासून या स्पर्धेची रचना बदलली गेली. यावेळी संयुक्त अरब अमिराती आणि हाँगकाँगचाही स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. ही स्पर्धा पहिल्यांदाच तीन फेरीत खेळवली गेली. यात साखळी फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशी रचना होती. यावेळी श्रीलंकेने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.

– भारतीय संघ 2008 ला एशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला. यावेळीही भारत आणि श्रीलंका हे दोन संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले. या सामन्यात श्रीलंकेकडून अजंता मेंडिसने एशिया कपच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी करत 13 धावात 6 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेला विजेतेपद मिळवून दिले.

– 2010 मध्ये झालेल्या एशिया कपमध्ये भारताने 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले होते. यावेळी ही स्पर्धा भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या चार संघातच खेळवली गेली. ज्यात अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात केली होती.

यावेळीच्या स्पर्धेत विरेंद्र सेहवागने अंतिम सामन्यात 6 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. हा एशिया कपच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी स्ट्राइक रेट आहे.

– 2012 मध्ये भारत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. यावेळी पाकिस्तानने रोमांचकारी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशवर मात करत दुसऱ्यांदा एशिया कपचे विजेतेपद पटकावले.

– भारतासाठी 2012 चा एशिया कप खराब ठरला असला तरी भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या पाकिस्तान विरुद्ध केली होती. त्याने 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतना 183 धावा केल्या होत्या. तसेच आत्तापर्यंतचा एशियाकपमधील संघाचीही सर्वोत्तम धावसंख्याही आहे.

– तसेच एशिया कपच्या इतिहासातील विराटच्या 183 धावा या सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्याही आहे.

– अफगाणिस्तानने 2014 मध्ये एशिया कपमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला. यावेळीही भारत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद जिंकले.

– 2015 मध्ये आयसीसीच्या एशियन क्रिकेट काउंसीलने एशिया कप ही स्पर्धा वनडे आणि टी20 या प्रकारात रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2016 मध्ये एशिया कप पहिल्यांदाच टी20 प्रकारात खेळवली गेली.

2016 च्या या एशिया कपमध्ये भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव करत सहाव्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी उचलली.

– एशिया कपचे भारताने सर्वाधिक 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे.  त्यापाठोपाठ श्रीलंका 5 आणि पाकिस्तानने 2 वेळा विजेतेपद मिळवले आहे.

– सनथ जयसुर्या हा एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 1220 धावा केल्या आहेत, तर मुथय्या मुरलीधरन हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत 30 विकेट्स घेतल्या आहेत.

-जयसुर्याने या स्पर्धेत सर्वाधित शतके करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने 6 शतके या स्पर्धेत केली आहेत.

– एशिया कपमधील सर्वोत्तम 95.16 ही सरासरी ही भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आहे.

– आत्तापर्यंत एकदाही भारतीय फलंदाज शून्य धावेवर एशिया कप स्पर्धेच्या वनडे प्रकारात बाद झालेला नाही. या स्पर्धेत सर्वाधिक 17 वेळा श्रीलंकन फलंदाज शून्य धावेवर बाद झाले आहेत.

– बांगलादेशने एशिया कपचे सर्वाधिक वेळा यजमानपद स्विकारले आहे. आत्तापर्यंत 5 वेळा बांगलादेशमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे.

– श्रीलंका हा एकमेव संघ असा आहे, जो आत्तापर्यंत झालेल्या 13 ही एशिया कप स्पर्धेत सहभागी झाला आहे.

– श्रीलंकेच्या लसिथ मंलिगाने सर्वाधिक वेळा एका सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने 3 वेळी अशी कामगिरी केली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

हा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय विराटविना देखील भारत तितक्याच ताकदीचा

संपुर्ण यादी- असे आहेत एशिया कप २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

भारताचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आव्हान संपुष्टात