एशिया कप २०१८: पाकिस्तानने भारतासमोर ठेवले १६३ धावांचे आव्हान

दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आज सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठवले आहे.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची सुरुवात अडखळत झाली आहे. त्यांनी सुरुवातीच्या पाच षटकातच फकार जामन(0) आणि इमाम उल हक(2) या सलामीवीरांची विकेट गमावली होती. या दोघांनाही भुवनेश्वर कुमारने बाद केले.

पण त्यानंतर शोएब मलिक आणि अझम बाबरने 82 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण 22 षटकात आझमला कुलदीप यादवने बाद करत ही जोडी तोडली. आझमने या सामन्यात 62 चेंडूत 47 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार मारले.

तर मलिकने 1 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 67 चेंडूत 43 धावा केल्या. आझम बाद झाल्यानंतर लगेचच केदार जाधवने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला(6) बाद केले अहमदचा झेल बदली क्षेत्ररक्षक मनिष पांडेने बाउंड्री लाइनवर अफलातून घेतला.

त्यानंतर लगेचच मलिकही बाद झाला. यानंतर मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पाकिस्तानकडून अन्य फलंदाजांपैकी शदाब खान(8), फहीम अशरफ(21), हसन अली(1), आसिफ अली(9), मोहम्मद अमीर(18) यांनी धावा केल्या.

भारताकडून भुवनेश्वर कुमार(3/15), केदार जाधव(3/23), जसप्रीत बुमराह(2/23) आणि कुलदीप यादवने(1/37) विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव 43.1 षटकात 162 धावांवर संपुष्टात आणला.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: टीम इंडियाने सामन्यानंतर हाँग काँगला दिली खास भेट

एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच