आशिया कपचा यजमान भारत पण सामने होणार या देशात

या वर्षीच्या आशिया कपचे यजमानपद भारत भुषविणार आहे. पण हे सामने भारतात होणार नसुन शारजाह, अबुधाबी आणि दुबई येथे होणार आहेत. या मालिकेचे सामने 13 ते 28 सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत.

भारतात हे सामने न खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) घेतला आहे. आज झालेल्या चर्चेत बिसीसीआयने ही मालिका युनायटेड अरब इमिरेट्स (युएई ) मध्ये घेण्याचा प्रस्ताव एसीसी समोर मांडला होता.

“आशिया कपचे यजमान पद भारताकडे आहे. पण या मालिकेतील सामने युएई, अबुधाबी आणि दुबई येथे खेळवले जावे असा आमचा प्रस्ताव होता. तसेच आमचा हा प्रस्ताव आशियाई क्रिकेट कौन्सिलने मान्य केला आहे “, असे बिसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले.

तसेच चौधरी यांनी भारतात हे सामने न खेळवण्यामागचे कारण सांगितले नाही. पण भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणाव हे याचे मुख्य कारण असू शकते.

पुन्हा एकदा 50 षटकांचा सामना : 2016 च्या आशिया कपमधील सामने हे 20-20 षटकांचे होते. यंदाचे सामने मात्र जुन्या स्वरुपात होणार आहे. ” ह्या मालिकेतील सामने हे 50 षटकांचे होणार आहेत “, असेही चौधरी म्हणाले.

आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगानिस्तान हे पाच संघ सहभाग घेणार आहे. तर सहावा संघ हा बाद फेरीतून निवडला जाणार आहे. यामध्ये युएई, हॉँँग कॉँग , नेपाल, अोमन आणि पपुआ न्यु गिनी या संघांचा समावेश आहे.

पुढची आशियाई क्रिकेट कौन्सिलची बैठक:  2018 चा उद्योनमुख संघाच्या आशिया कपचे यजमानपद श्रीलंका आणि पाकिस्तानकडे आहे. ही मालिका आधी एप्रिलमध्ये होणार होती पण ती आता डिसेंबरमध्ये होणार आहे. तसेच पाकिस्तानमध्ये पुढची आशियाई क्रिकेट कौन्सिलची चर्चा होणार आहे.