एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक

दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेत आज(21 सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.

या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 174 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार नाबाद अर्धशतक करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

भारताने 174 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर फलंदाज रोहित आणि शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली होती. शिखरने सुरुवातीला आक्रमक खेळ केला होता, तर रोहितने त्याला चांगली साथ दिली.

मात्र शिखरला बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने पायचीत बाद करत ही जोडी तोडली. शिखरने या सामन्यात 47 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या आहेत.

शिखर बाद झाल्यानंतर अंबाती रायडू फलंदाजीसाठी आला. पण त्याला खास काही करता आले नाही. त्याने रोहितबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली आणि तो 13 धावांवर असताना बाद झाला. त्याला रुबेल हुसेनने मुशफिकूर रहिमकडे झेल देण्यास भाग पाडले.

रायडू बाद झाल्यानंतर धोनी बढती घेऊन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने रोहितला उत्तम साथ दिली. यानंतर रोहित आणि धोनीने तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचत भारताला विजयाच्या समीप पोहचवले.

रोहितने 105 चेंडूत 83 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. हे त्याचे एशिया कप 2018 मधील सलग दुसरे अर्धशतक आहे. त्याने याआधी पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केले होते.

तसेच या सामन्यात रोहितला साथ देताना धोनीने 37 चेंडूत 3 चौकारांसह 33 धावा केल्या आहेत. मात्र धोनी भारताला विजयासाठी 4 धावांची गरज असताना बाद झाला. त्याला बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने बाद केले.

त्यानंतर अखेर रोहित आणि दिनेश कार्तिकने(1*) भारताला 36.2 षटकात 174 धावांचे लक्ष्य यशस्वी पार करत विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी बांगलादेशला 49.1 षटकात 174 धावात रोखण्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोलाचे योगदान दिले होते. त्याने गोलंदाजी करताना 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.

बांगलादेशची मात्र अडखळत सुरुवात झाली होती. त्यांनी 6 षटकातच त्यांचे लिटॉन दास(7) आणि नाझमुल हुसेन शान्तो(7) यांच्या विकेट गमावल्या होत्या. दासला भुवनेश्वर कुमार आणि नाझमुलला जसप्रीत बुमराहने बाद केले.

या दोन धक्क्यांनंतरही बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. त्यांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

पण नंतर मश्रफे मोर्तझा(26) आणि मेहदी हसन(42) यांनी आठव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत बांगलादेशला दिडशे धावांचा टप्पा पार करुन दिला होता.

मोर्तझाने 32 चेंडूत 26 धावा आणि मेहदी हसनने 50 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 42 धावा केल्या. मोर्तझाला भुवनेश्वरने आणि हसनला बुमराहने बाद केले.

मात्र बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन(17), मुशफिकूर रहिम(21) आणि मदमुल्लहा(25) यांनी थोडीफार लढत दिली होती. मात्र तेही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर स्वस्तात माघारी परतले. यातील शाकिब आणि मुशफिकूर यांना जडेजाने बाद केले.

बांगलादेशच्या अन्य फलंदाजांपैकी मुसद्दक हुसेन(12), रुबेल हुसेन(2*) आणि मुस्तफिझुर रेहमान(3) यांनी धावा केल्या.

भारताकडून जडेजाने 4 तर अन्य गोलंदाजांपैकी भुवनेश्वर कुमार(3/33), जसप्रीत बुमराह(3/37), यांनी विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट

वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा