एशिया कप २०१८: भारत विरुद्ध हाँग काँग सामन्याबद्दल सर्वकाही…

दुबई। आज (18 सप्टेंबर) एशिया कप 2018 च्या साखळी फेरीत भारत विरुद्ध हाँग काँग संघात सामना पार पडणार आहे. हा सामन्याने भारताची एशिया कपची सुरुवात होणार आहे.

भारतीय संघ हा सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करेल, तर हाँग काँगला बलाढ्य भारताला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कारण हाँग काँगला या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 8 विकेट्सने गमवावा लागला होता.

भारतीय संघ या स्पर्धेत नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्याने प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल. रोहितने याआधी श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे.

भारत या सामन्यात योग्य संघबांधणीसाठी खेळाडूंना तपासून पाहाण्याची शक्यता. कारण लगेचच उद्या (19 सप्टेंबर) भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

मात्र असे असले तरी भारतासाठी मधल्या फळीत कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न आहे. भारताकडे त्यासाठी अनेक पर्याय आहेत. यात अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, केएल राहुल असे पर्याय आहेत. पण यातील कोणाला संधी मिळते हे पहावे लागेल.

त्याचबरोबर गोलंदाजीसाठी भारताकडे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल आहे, तर त्यांना साथ देण्यासाठी अष्टपैलू अक्षर पटेल असेल. त्याचबरोबर भारताकडे वेगवान गोलंदाजांच्या फळीत जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आहे. तसेच तळातील फलंदाजीला भक्कम बनवण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याही आहे.

हाँग काँगच्या संघाचे नेतृत्व 20 वर्षीय युवा अंशुमन राठ करत आहे. त्यांच्यासाठी त्यांची कमकुवत फलंदाजी हा यक्ष प्रश्न आहे. पण त्याचबरोबर त्यांच्याकडे गमावण्यासारख काही नसल्याने ते त्यांचा नैसर्गिक खेळ करतील.

हाँग काँग संघात उत्तम फिरकी गोलंदाज आणि मध्यमगती गोलंदाजांचे मिश्रण आहे. यात तन्वीर अफजल, एजाज खान आणि एहसान नवाज यांसारखे वेगवान गोलंदाज तर नदीम अहमद आणि एहसान खान सारखे फिरकीपटू आहेत.

परंतू फलंदाजी ही हाँग काँगची कमकुवत बाजू आहे. तरीही 20 वर्षीय अंशुमन राठ आणि बाबर हयात हे फलंदाज धावा करण्यास उत्सुक आहेत.

भारत आणि हाँग काँग हे संघ याआधी 2008 मध्ये एशिया कपमध्येच आमने सामने आले होते. आत्तापर्यंत या दोन संघात हा एकमेव सामना पार पडला आहे. या सामन्यात भारताने हाँग काँगला 256 धावांनी पराभूत केले होते.

भारत विरुद्ध हाँग काँग कधी होणार आहे एशिया कपमधील सामना?

भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील एशिया कपचा सामना 18 सप्टेंबर 2018 ला होणार आहे.

कोठे होईल भारत विरुद्ध हाँग काँग एशिया कपमधील सामना?

भारत विरुद्ध हाँग काँग एशिया कपमधील सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल भारत विरुद्ध हाँग काँग एशिया कपमधील सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील एशिया कपमधील सामन्याला सुरुवात होईल.

भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील एशिया कपमधील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स 1,  स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 एचडी  या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील एशिया कपमधील सामना पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील एशिया कपमधील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

hotstar.com या वेबसाईटवर भारत विरुद्ध हाँग काँग एशिया कपमधील सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल.

हाँग काँग: अंशुमन राठ (कर्णधार), आयझ खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकअल्सन, क्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाज, अरशद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, निजाकत खान, राघ कपूर, स्कॉट मॅकेकनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, आफताब हुसेन.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग

विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस, बनणार केवळ तिसरा क्रिकेटर