आशिया हॉकी कप २०१७: भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी

आज भारतीय हॉकी संघाचा दक्षिण कोरिया विरुद्ध आशिया हॉकी कप २०१७ मधील सुपर फोरचा पहिलाच सामना होता. त्यात भारताला अखेरच्या मिनिटात गोल करून सामना बरोबरीत राखण्यात यश आले आहे. या सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली.

दक्षिण कोरियाचे बचाव तंत्र खूप चांगले होते. पण अखेरच्या मिनिटाला हे बचाव तंत्र भेदत गुरजंत सिंगने गोल केला. दक्षिण कोरियाकडून जंगजून लीने एक गोल केला होता. सामन्याच्या पहिल्या उत्तरार्धात दोन्हीही संघाकडून एकही गोल झाला नव्हता.

आशिया  हॉकी कप २०१७ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने उत्तम कामगिरी केली आहे. ३ दिवसांपूर्वी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ अशी धूळ चारली. हा त्यांचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय होता. या विजयासह भारतीय संघ ग्रुप ए मध्ये ते अव्वल स्थानी राहिले.

पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाकडून चिंगलेन्सना सिंग ने १३व्या मिनिटाला, रमनदीप सिंगने ४४ व्या मिनिटाला तर हरामनप्रीत सिंगने ४५ व्या मिनिटाला गोल केले होते तसेच पाकिस्तानकडून एकमेव गोल अली शानने केला होता.

याचबरोबर भारताने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात जपानला ५-१ ने तर दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशला ७-० ने या स्पर्धेत हरवले आहे. यामुळे भारतीय संघ सुपर फोरमध्ये ग्रुप ए च्या अव्वल स्थानासह पोहचला.

यानंतर भारताची सुपर फोर मधील लढत मलेशिया विरुद्ध उद्या होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध शनिवारी सामना होईल.