Breaking: एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा

0 1,680

सोनिपत ।आज गोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. १४ खेळाडूंच्या पुरुष संघाचे नेतृत्व अपेक्षप्रमाणे अनुभवी अजय ठाकूरकडे देण्यात आले आहे तर महिला संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे करणार आहे.

ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे होणार आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबर रोजी सकाळी इराणला मार्गस्थ होईल.

पुरुषांच्या संघात कोणत्याही महाराष्ट्राच्या खेळाडूला स्थान देण्यात आले नाही. १५ दिवसांपूर्वी संभाव्य ३६ खेळाडूंच्या संघात सचिन शिंगाडे, काशिलिंग आडके आणि रिशांक देवाडिगा या महाराष्ट्रीयन पुरुष तर महिला खेळाडूंमध्ये पूजा शेलार, सायली जाधव आणि अभिलाषा म्हात्रे यांचा समावेश होता. परंतु यातील सचिन शिंगाडे, काशिलिंग आडके आणि रिशांक देवाडिगा पुरुष संघात तर पूजा शेलार महिला संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.

महिलांच्या संघाचे नेतृत्व महाराष्ट्रीयन अभिलाषा म्हात्रे करत आहे. तिच्याबरोबर सायली जाधव या दुसऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

पुरुष संघाचे उपकर्णधारपद सुरजीतकडे तर महिला संघाचे उपकर्णधारपद प्रियंकाकडे देण्यात आले आहे.

असा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघ: अजय ठाकूर(कर्णधार), सुरजीत(उपकर्णधार), दीपक हुडा, महेंद्र सिंह ढाका, मणिंदर सिंग, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, विशाल भारद्वाज.

असा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय महिला संघ: अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कांचन ज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका(उपकर्णधार), प्रियंका नेगी, रणदीप कौर खेडा, रितू, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया.

Comments
Loading...
%d bloggers like this: