तिसरी कसोटी: पहिल्या सत्रात भारताच्या २ बाद ४५ धावा

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात न्यू वांडरर्स स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २७ षटकात २ बाद ४५ धावा केल्या आहेत.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भारताची सुरुवात खराब झाली. केएल राहुल(०) आणि मुरली विजय(८) हे दोन्ही सलामीवीर लवकर तंबूत परतले.

राहुलला व्हर्नोन फिलँडरने आणि विजयला कागिसो रबाडाने बाद केले. या दोघांचेही यष्टीरक्षक क्विंटॉन डिकॉकने झेल घेतले. हे दोघेही लवकर बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ८.४ षटकात २ बाद १३ अशी झाली होती.

त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने डाव सावरला. पुजाराने हा डाव सावरताना खूपच सावध खेळ केला. त्याने पहिली धाव घेण्यासाठी तब्बल ५३ चेंडू खेळले आणि ५४ व्या चेंडूवर पहिली धाव घेतली. विराटने मात्र आपल्या लयीत खेळ केला. सध्या पुजारा ५ धावांवर आणि विराट २४ धावांवर नाबाद खेळत आहेत.