जबरदस्त लयीत असणाऱ्या गोव्याचे एटीकेसमोर कडवे आव्हान

कोलकता । हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात नववर्षातील पहिल्या लढतीत बुधवारी एटीकेसमोर एफसी गोवा संघाचे आव्हान असेल. एटीकेने दोन सामने जिंकले आहेत, पण गोव्याने कमी सामन्यांत सरस कामगिरी करीत घणाघाती फॉर्म प्रदर्शित केला आहे. त्यामुळे एटीकेला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

एटीकेने सलग तिसरा विजय मिळविला तर त्यांच्या मोहिमेत आणखी जान येईल, पण गोव्याचा संघ एफसी पुणे सिटीविरुद्धच्या पराभवातून सावरण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. जिंकल्यास गोवा 15 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवू शकतो. त्यामुळे गोव्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

गोव्याचे सहाय्यक प्रशिक्षक डेरीक परेरा यांनी सांगितले की, मोहीमेत एखादा दिवस खराब जातो. पुण्याविरुद्ध आम्ही संधी दवडल्या. काही निर्णय सुद्धा आमच्या विरोधात गेले, पण फुटबॉलमध्ये असे घडते. हे विसरून तुम्ही विजयी मार्गावर पुन्हा वाटचाल करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तुमची शैली, संघाचे स्वरुप कायम ठेवून आनंददायक फुटबॉल खेळण्याचे आव्हान असते.

आक्रमणावर जास्तच भर दिला गेल्याचा फटका बसल्यामुळे बचाव भक्कम करण्याच्या उद्देशाने सराव सुरु असल्याची माहिती परेरा यांनी दिली. संपूर्ण संघ कोलकत्यात दाखल झाला असून खेळाडूंच्या दुखापतीची कोणतीही समस्या नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुळ कार्यक्रमानुसार हा सामना 31 डिसेंबर रोजी होणार होता, पण ऐनवेळी बदल झाला. ही काहीशी काळजीची बाब ठरली तरी जादा दोन दिवस मिळाल्यामुळे चांगला सराव करता आला. आम्ही 31 तारखेच्या सामन्यासाठी सज्ज होतो, पण दोन दिवस जादा मिळाल्याचा फायदा उठविला, असे त्यांनी सांगितले.

हा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आम्ही वेगळ्य शैलीचा खेळ करणाऱ्या संघाविरुद्ध खेळू. अर्थात आम्ही आमच्या शैली कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करू, अशी पुष्टी परेरा यांनी जोडली.

दरम्यान, एटीकेचे प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांच्यावरील दडपण काहीसे कमी झाले आहे. एटीकेने मुंबई सिटी एफसी आणि दिल्ली डायनॅमोज या ंसघांवर मात केली. दोन विजय मिळवित या संघाने गुणतक्त्यात सातव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. गतविजेते असल्यामुळे त्यांना फॉर्म कायम राखण्याची आणि पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याची गरज आहे. एटीके आणि चौथ्या स्थानावरील मुंबई यांच्यात पाच गुणांचा फरक आहे, पण एटीकेच्या हातात दोन सामने जादा आहेत. याचा फायदा उठविण्याची एटीकेला गरज आहे.

रॉबी किन याच्या फॉर्ममुळे एटीके संघाला संजीवनी लाभली आहे. त्याच्याविषयी शेरींगहॅम भरभरून बोलले. त्यांनी सांगितले की, रॉबी हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. सरावाच्या वेळी तो दररोज काहीतरी खास गोष्ट करतो. खेळाडू त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहतातत. त्यामुळेच मी त्याला येथे पाचारण केले.
मँचेस्टर युनायटेडच्या या माजी स्ट्रायकरला घरच्या किंवा बाहेरच्या मैदानावरील फॉर्मविषयक आकडेवारीची फिकीर वाटत नाही. हे संदर्भ पत्रकार परिषदेत देण्यात आले असता त्यांनी फॉर्मच्या संदर्भात शैलीचे समर्थन केले.

त्यांनी सांगितले की, आम्ही पिछाडीवर राहून बचाव करायचे धोरण पत्करले आहे असे नाही. आम्ही सुरवातीपासून संघांविरुद्ध आक्रमण केले आहे. गोल करण्याचे आणि ते जेवढ्या लवकर जमतील तेवढे चांगले ठरते असाच आमचा दृष्टिकोन आहे. हे मात्र काही वेळा घडतेच असे नाही.
एटीकेने गोव्याला हरवून तीन गुण वसूल केले आणि सलग तिसरा विजय मिळविला तर प्रतिस्पर्ध्यांना खणखणीत इशारा मिळालेला असेल.