आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 षटकात 1 बाद 28 धावा केल्या आहेत.

आॅस्ट्रेलियाने 323 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली होती. मात्र 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने अॅरॉन फिंचला बाद करत आॅस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आहे.

आॅस्ट्रेलियाकडून सध्या दुसऱ्या सत्र संपले तेव्हा मार्क्यूस हॅरिस 14 धावांवर नाबाद खेळत आहे. आॅस्ट्रेलियाला अजून 295 धावांची गरज आहे.

तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

भारताने आज 3 बाद 151 धावांसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पुजारा आणि रहाणे यांनी दिवसाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळू न देता 87 धावांची अर्धशतकी भागीदारीही रचली. पण आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पुजाराला 71 धावांवर असताना बाद केले.

त्यानंतर लगेचच लायनने रोहित शर्माचीही विकेट मिळवली. रोहितला फक्त 1 धावच करता आली. यानंतर काहीवेळाने आक्रमक खेळण्याचा नादात रिषभ पंतनेही 28 धावांवर लायनच्याच गोलंदाजीवर विकेट गमावली.

पंत बाद झाल्यावर काहीवेळात अश्विनही 5 धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात लायनने लागोपाठच्या चेंडूंवर रहाणे आणि मोहम्मद शमी यांची विकेट घेतली. पण तत्पूर्वी रहाणेने 70 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यानंतर अखेर मिशेल स्टार्कने इशांत शर्माला बाद करत भारताचा डाव 307 धावांवर संपुष्टात आणला.

त्यामुळे भारताने आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीसह विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य दिले आहे.

आॅस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने सर्वाधिक 122 धावांत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच मिशेल स्टार्कने 40 धावांत 3 आणि जोश हेजलवूडने 43 धावांत 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: भारताचा कॅनडावर विजयी पंच, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

एकेकाळी आॅस्ट्रेलियाला नडलेला भारतीयच आला विराटच्या मदतीला

८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं