ऑस्ट्रेलिया संघ परतणार १९८० च्या दशकात!

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 12 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघा जून्या आठवणींना उजाळा देणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत 1986 च्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

अगामी वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघांने आज फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये 33 वर्षांपूर्वीच्या जर्सीप्रमाणेच आत्ताच्या संघाने जर्सी घातल्याचे दिसून आले आहे. 33 वर्षांपूर्वी 1986मध्ये ऍलन बॉर्डर कर्णधार असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरुद्ध अशीच जर्सी घातली होती.

या जर्सीबद्दल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पिटर सिडलने म्हटले आहे की हे खूप उत्साहवर्धक आहे. तसेच तो मजेने म्हणाला, ‘मी हेडबँड घालण्याचा विचार करत होतो. त्यासाठी मी ऍडम झम्पाला त्याचा हेडबँड घेऊन येण्यासाठी सांगेल, ज्यामुळे ते डेनिस लीली यांच्याप्रमाणे दिसेल.’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील अगामी वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या वनडे संघात जवळजवळ 9 वर्षांनी वेगवान गोलंदाज सिडलचे पुनरागमन झाले आहे. त्याने शेवटचा वनडे सामना 2010 मध्ये खेळला होता. पिटर बरोबरच उस्मान ख्वाजा, नॅथन लायन यांनीही वनडे संघात पुनरागमन केले आहे.

त्याचबरोबर झे रिचर्डसन, जेसन बेर्हेनडॉर्फ आणि बिली स्टॅनलेक यां वेगवान गोलंदाजांचाही ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद रोहित शर्मा सांभाळेल. या वऩडे मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये दुखापतीला सामोरे जावे लागलेल्या हार्दिक पंड्या आणि केदार जाधवचेही भारताच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. याबरोबरच अंबाती रायडूचाही या भारतीय वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.

गोलंदाजांच्या फळीत वनडे मालिकेसाठी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा  आणि मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच या मालिकेत भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेसाठी असे आहेत संघ-

भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया संघ-

ऍरॉन फिंच(कर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनीस, एश्टन टर्नर, ऍलेक्स कॅरे(उपकर्णधार), झे रिचर्डसन, बिली स्टॅनलेक, जेसन बर्हेनडॉर्फ, पिटर सिडल, नॅथन लायन, ऍडम झम्पा.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेचे वेळापत्रक – 

पहिला वनडे – 12 जानेवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंड – सकाळी – 7.50 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

दुसरा वनडे – 15 जानेवारी, अॅडलेड ओव्हल – सकाळी – 8.50 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

तिसरा वनडे – 18 जानेवारी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड – सकाळी -7.50 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडिया विरुद्धच्या वन-डे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!

संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

अमिरीती विरुद्ध भारताला दक्ष राहण्याची गरज