चेंडूंबरोबर छेडछाड केल्याचे ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव्ह स्मिथने केले मान्य

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत अनेक घटनांमधून क्रिकेटच्या संस्कृतीला धक्का बसला आहे. अगदी पहिल्या कसोटीपासून या दोन देशांमधील खेळाडूंचे वाद काही संपायचे नाव घेत नाही. आता पुन्हा ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी केलेला लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे.

द. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसादरम्यान ऑस्ट्रलियाकडून चेंडूंबरोबर छेडछाड झाल्याचे त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मान्य केले आहे. तसेच त्याने हे खूप ओशाळवाणे असल्याचे सांगताना या प्रकरणाची कर्णधार म्हणून जबाबदारी घेतली आहे.

चेंडू स्विंग व्हावा म्हणून हा प्रकार करण्याचे ठरवले असल्याचेही स्मिथने सांगितले. तसेच ही योजना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्टने मैदानात प्रत्यक्षात आणल्यामुळे त्याला आयसीसीने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्याला १००% दंड तसेच १ सामन्याची बंदी अशी शिक्षा होऊ शकते.

मैदानावरील पंचांना काही समजू नये म्हणून तो पिवळ्या रंगाचा टेप त्याच्या पॅन्टमध्ये लपवत होता, पण त्याची ही क्रिया टीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.

याबद्दल तिसऱ्या दिवसा खेळानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये बॅनक्रोफ्टने पश्चाताप झाल्याचे सांगताना म्हटले , ” जे काही झालं त्याबद्दल मला कसलाही अभिमान वाटत नाही. मला आता या प्रकरणामुळे जे काही परिणाम होतील त्याला सामोरे जावे लागणार आहे. मी यातून पुढे जाण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी माझा सर्वोत्तम देईल.”

तसेच स्मिथने याबद्दल माफी मागताना हे सर्व अभिमानास्पद नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तो म्हणाला ही खरी क्रीडाभावना नाही. स्मिथने पुढे असेही आश्वासन दिले की पुढे असे प्रकार होणार नाही. त्याने असेही सांगितले की यात प्रशिक्षकांचा कोणताही सहभाग नव्हता. हे सर्व खेळाडूंकडूनच करण्यात आले होते.

तसेच स्मिथने या प्रकरणाची कर्णधार म्हणून जबाबदारी घेतली असली तरी त्याने कर्णधारपद सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.