आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवरच संपुष्टात, भारताकडे १५ धावांची आघाडी

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियचा पहिला डाव सर्वबाद 235 धावांवर संपला आहे. त्यामुळे भारताने या सामन्यात 15 धावांची आघाडी घेतली आहे.

या सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा सुरु झाला. आॅस्ट्रेलियाने 7 बाद 191 धावसंख्येवरुन खेळायला सुरुवात केली. पण 2.4 षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा खेळ थांबवण्यात आला होता.

असे असले तरी जसप्रीत बुमराहला पुन्हा खेळ थांबण्याच्या आधी शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असणाऱ्या मिशेल स्टार्कची विकेट घेण्यात यश आले आहे. स्टार्कला 15 धावांवर असताना बुमराहने बाद केले आहे. त्याचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला.

त्यानंतर पुन्हा भारतीय प्रमाणवेळे नुसार 7.30 वाजता सामन्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर काहीवेळातच मोहम्मद शमीने एकाकी झुंज देणाऱ्या ट्रेविस हेडला 99 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर शमीने जोश हेझलवूडला बाद करत आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 98.4 षटकात 235 धावांवर संपुष्टात आणला.

हेडने आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. त्याने 167 चेंडूत 72 धावा करताना 6 चौकार मारले. पण शमीने शॉर्टलेन्थवर टाकलेल्या चेंडूवर हेडचा फटका चुकल्याने चेंडू सरळ यष्टीरक्षक पंचच्या हातात गेला.

भारताकडून या डावात जसप्रीत बुमराह(3/47), आर अश्विन(3/57), इशांत शर्मा(2/47) आणि मोहम्मद शमी(2/58) यांनी विकेट्स घेतल्या.

यानंतर पुन्हा भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदैनावर आले असतानाच पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पुजाराने शतकी खेळी केली अॅडलेडमध्ये, चर्चा झाली कोलकाता पोलिसांत

त्या एका विजयाने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल

जगातील कोणत्याही संघावर येऊ नये ती वेळ आज पाकिस्तानवर आली