दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

ख्राइस्टचर्च। १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या विजयात ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड या फलंदाजाने चांगली कामगिरी केली.

अफगाणिस्तानने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा संघ ४८ षटकांत १८१ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून केवळ इक्राम अली खील याने चांगली खेळी करताना ८८ धावा केल्या. अन्य कोणत्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोनाथन मेरलोने ४ विकेट्स घेतल्या.

१८२ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने हे लक्ष ३७.३ षटकांत केवळ ४ विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केले. जॅक एडवर्डने सलामीला येत ७२ धावा केल्या तर परम उपलने नाबाद ३२ धावा केल्या.

या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरी गाठली आहे. त्यांचा सामना आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

उद्या ह्याच मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे तर अंतिम फेरीचा सामना ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.