Video: ऑस्ट्रेलियाला त्या दोन चुका पडल्या महागात, गमवावी लागली मालिका!

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताच्या या विजयात एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.

धोनीने आज या सामन्यात 114 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. त्याचबरोबर त्याला केदारने 57 चेंडूत 61 नाबाद धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 121 धावांची भागीदारी रचली.

ऑस्ट्रेलियाला या सामन्यात त्यांच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांच्या झेल घ्यायच्या संधी सोडल्या.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर रोहित शर्माची विकेट लवकर गमावली. नंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने संथगतीने खेळायला सुरूवात केली असता तो 10 धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले.

झाले असे की, 12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोहलीने बिली स्टनलेकच्या गोलंदाजीवर शॉट मारला असता स्लीपमध्ये उभा असलेल्या पीटर हॅंड्सकोम्बने त्याचा झेल सोडला आणि विराटला जीवदानाबरोबर चौकारही मिळाला. नतंर त्याने 62 चेंडूत 46 धावांची खेळी केली आहे.

त्यानंतर 17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीचा झेल सोडल्याने ऑस्ट्रेलियाला खूपच नुकसान झाले. तो शिखर धवन बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

यावेळी धोनी खेळत असलेल्या पहिल्याच चेंडूवर त्याचा झेल 30 यार्डच्या वर्तुळात उभा असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने सोडला. त्यावेळी गोलंदाज मार्कस स्टॉयनीसलाही समजले नाही की नक्की झाले काय.

मालिकावीर धोनीने हा सामना जिंकून देत भारताला ही मालिकाही जिंकून दिली आहे. या मालिकेत त्याने तीन अर्धशतके केली असून भारताकडून सर्वाधिक असे 193 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील अशी आहे एमएस धोनीची खास कामगिरी

एमएस धोनीने अखेर ‘ती’ खास शंभरी गाठलीच!

असा पराक्रम करणारा धोनी भारताचा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू